संगमेश्वर : तुरळ ग्रामस्थांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

संगमेश्वर : पाणीपट्टी भरलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी बंद केल्यामुळे तुरळ गावचे सरपंच सहदेव सुवरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, या मागणीसाठी तुरळ येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ग्रामस्थ आंदोलन करणार, असे समजताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मौजे तुरळ निर्मल तंटामुक्त ग्रुपग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील हरेकरवाडी या महसूल गावात ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेप्रमाणेच अन्य चार स्वतंत्र खासगी योजना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरलेली असतानाही सरपंच सहदेव सुवरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचाही पाणीपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याचा प्रकार झाल्यानंतर ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांना पत्र देत हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. याबाबत सरपंच यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याने अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देण्यात आले. त्यानुसार कार्यवाही न झाल्याने बुधवारी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी नंदकुमार फडकले, विजय बामणे, संदीप येलोडे, मंजिरी फडकले, शमिका बामणे यांच्यासह ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आपली बाजू मांडताना आंदोलनकत्यांनी सरपंच सुवरे यांनी पाणीपट्टी भरलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता राजकीय सूडबुद्धीने आमचे व शाळेचे पाणी बंद केल्याचे सांगितले.

वीज बिले आणि पाणीपट्टी बिले थकीत असल्याने योजना चालवणे ग्रामपंचायतीला परवडणारे नसून वीज बिले आणि पाणीपट्टी थकीत असल्याने आपण हे पाणी बंद केले होते. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतर आपण तत्काळ पाणी सुरू केले आहे. – सहदेव सुवरे, सरपंच, तुरळ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 16/Jan/2025