◼️ मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
जयपूर:
Abhijit Dipke Jaipur News च्या माध्यमातून राजस्थानमधील आंदोलनातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना राजस्थानची राजधानी जयपूर येथे आंदोलनादरम्यान मारहाण केल्याची घटना घडली आहे. जयपूर येथे NEET पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतील भोंगळ कारभार आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे तीव्र निदर्शन सुरू होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या अभिजीत दीपके यांच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थ्यांच्या गराड्यात आणि गोंधळात एका युवकाने पुढे येत दीपके यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
गर्दीतून आलेल्या युवकांचा हल्ला; आंदोलनस्थळी उडाला गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दीपके याने महाराष्ट्रातील पुणे येथे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर आज जयपूर येथील आंदोलनस्थळी तो विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोहोचला होता. अभिजीत आंदोलनस्थळी पोहोचला असता, गर्दीतून अचानक ३ युवक तिथे आले. त्यातील एका युवकाने थेट पुढे होत अभिजीत दीपकेच्या कानफाडात मारली आणि त्यानंतर दीपकेवर सातत्याने मारहाणीचा प्रयत्न केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला. तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मारहाण करणाऱ्या युवकाला तातडीने ताब्यात घेतले असून, त्याला विधायकपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
Abhijit Dipke Jaipur News: कोण आहे अभिजीत दीपके?
मूळचा महाराष्ट्रातील असलेला तरुण अभिजीत दीपके हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. मात्र, अलीकडच्या काळात सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीशांच्या एका विशेष टिप्पणीमुळे भारतात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावारूपाला आली. या वेगळ्या नावाच्या पार्टीची स्थापना करणारा तरुण म्हणून अभिजीत दीपके देशपातळीवर ओळखला जातो. वर्ष २०२० ते २०२३ या कालावधीत अभिजीत हा आम आदमी पक्षाशी (AAP) संबंधित राहून काम करत असल्याचे बोलले जाते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांना दिली वाचा
अभिजीत दीपके याने देशातील बेरोजगारी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि युवकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला आहे. त्याने सुरू केलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजला अत्यंत अल्पावधीतच देशभरातील तरुणांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जयपूरमधील या मारहाणीच्या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 15-06-2026














