रत्नागिरी : एलईडी लाईट व विनापरवाना पर्ससीन मासेमारीला चाप बसवण्यासाठी मत्स्य विभागाने जोरदार मोहीम सुरू केली असून, मागील पाच दिवसांत पकडलेल्या नौकांवरील साहित्य जप्त करण्यात आले आहे. या नौका मालकांना नोटीस काढण्यात येणार असून लवकरच सुनावणी होणार असल्याचे रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खात्याचे सहायक आयुक्त आनंद पालव यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या किनार्यावर मागील काही दिवसांपासून कस्टम विभागाने कारवाईचा धडाका लावला होता. सलग तीन दिवस एलईडी लाईट दाखवणार्या तीन नौका ताब्यात घेताना त्यावरील जवळपास तीस लाखाहून अधिकाचे साहित्य जप्त केले होते. कस्टमच्या या धडक कारवाईमुळे मच्छीमारांनीही धसका घेतला होता. त्यातच राज्याचे मत्स्य व बंदर खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत येऊन अधिकार्यांची कानउघडणी केली होती. त्यामुळे मत्स्य विभागाने जागृत रहात कारवाईचा बडगा उगारला. ड्रोनच्या मदतीनेही तीन बोटींवर कारवाई केली तर एलईडी वापरणार्या नौकाही जप्त केल्या.
मागील पाच दिवसात पाच एलईडी नौका तर तीन विनापरवाना मच्छीमारी नौका जप्त करण्यात आल्या आहेत. या आठही नौकांवरील साहित्य जप्त करण्यात आले आहे. या नौका मालकांना नोटीस बजावण्यात येणार असून याबाबत पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांनी सांगितले. याप्रकरणात प्रत्येक नौकेला किमान पाच लाखाचा दंड किंवा परवाना रद्द होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
ड्रोनच्या मदतीने किनार्यावर लक्ष ठेवण्यात येत असून, विनापरवाना नौका, एलईडी व पर्ससीन नौकांवर कारवाईला अधिक वेग येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 16-01-2025
