चिपळूण बसस्थानकासाठी वाढीव निधी द्यावा; आ. शेखर निकम यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

चिपळूण : कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चिपळूण बसस्थानकाच्या नव्या हायटेक इमारतीच्या कामाला 8 वर्षे उलटली तरी प्रकल्पाचा पाया तयार झालेला नाही. याबाबत संताप व्यक्त केला जात असून, या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पूर्णत्वासाठी वाढीव निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मुंबईत प्रत्यक्ष भेटीत केली आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे परिवहन मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे.

या निवेदनानुसार चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक इमारत नूतनीकरणाच्या कामाची महारानिविदा प्रक्रिया सन 2016 मध्ये निघाली होती. हे काम एका कंपनीला मिळाले होते. त्यांनी ते सन 2019 पर्यंत पूर्ण करायचे होते. इमारतीच्या पायाचे अर्धे काम करुन काम परवडत नाही, म्हणून अर्धवट स्थितीमध्ये सोडून दिले. त्यानंतर महामंडळाने या कामाचा ठेका संबंधित कंपनीकडून काढून घेतला. यानंतर नवीन निविदा चिपळूण बसस्थानकाची पुनर्बांधणी करणे या नावाने दि. 8 डिसेंबर 2020 या वर्षात 3 तीन कोटी 70 लाख रुपयाची संकेत स्थळावर जाहिरात केली. परंतु, या कालावधीमध्ये कोरोना महामारीमुळे व महामंडळाकडे निधी उपलब्ध नसल्याने ही निविदा मंजुरीसाठी 20 महिन्यांचा कालावधी गेला.

त्यानंतर जुलैमध्ये या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. परंतु अद्यापही चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक इमारतीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. या विषयाकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

पत्र्याच्या शेडखाली कारभार

बसस्थानकाचा कारभार एका पत्र्याच्या शेडखाली चालविला जात आहे. प्रवाशांना-विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठी जागा नाही, आवारात इतर सोयीसुविधाही नाहीत. यामुळे एस.टी.च्या वाहन चालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 17-01-2025