खेड रेल्वेस्थानकाला गणेशोत्सव काळात १४ लाखांचे उत्पन्न

खेड : गणेशोत्सवात मध्य व कोकण रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेही गणेशभक्तांच्या दिमतीला धावली. एकामागोमाग एक स्पेशल गाड्या सोडत चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत तब्बल ३१४ गणपती स्पेशलच्या फेऱ्या चालवल्या, ७ ते १७ सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत येथील रेल्वेस्थानकात १४ लाख २१ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न पदरात पडले.

उन्हाळी सुट्टीचा हंगाम व इतर सणांच्या तुलनेत गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या सर्वाधिक असते. गणेशोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाडघांसह ‘गणपती स्पेशल’ गाड्यांमध्ये प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा नसते. तरीही चढाओढीचा अन् लोंबकळत प्रवास करत घरच्या गणपतीला पोहोचणाऱ्या गणेशभक्तांची संख्याही लक्षणीय असते. यामुळे यंदाही रेल्वे प्रशासनाने ३१४ गणपती स्पेशलच्या फेऱ्या चालवल्या. त्यामध्ये दिवा चिपळूण मेमू स्पेशलच्या ३६ फेऱ्यांचाही समावेश होता. गणपती स्पेशल १ सप्टेंबरपासूनच कोकण मार्गावर धावू लागल्या होत्या; मात्र गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या दोन दिवस अगोदरपासून सर्वच रेल्वेगाड्यांना तुफानी गर्दी होती. त्यातच मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाच्या दिमतीला पश्चिम रेल्वेही चालवल्याने चाकरमान्यांना गाव गाठताना तरेच परतीच्या प्रवासात मुंबईची वाट धरताना दिलासा मिळाला. नियमित गाड्यांसह एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डचब्बे जोडण्यात आल्यामुळे प्रवास सुखकर होण्यास मदत झाली. पश्चिम रेल्वेमार्गावरील वांद्रे-मडगाव गाडी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर कायमस्वरूपी सुरू झाल्याने पश्चिम उपनगरात वास्तव्यास असणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास वाचला. आठवड्यातून चारवेळा धावणाऱ्या नव्या गाडीमुळे चाकामान्यांना दिलासा मिळाला आहे. या पाठोपाठ मध्यरेल्वेने पुणेस्थित चाकरमान्ऱ्यांसाठीही विशेष गाड्या चालवून तेथील गणेशभक्तांची चिंता दूर केली. परतीसाठीही या गाडया चालवण्यात आल्याने चाकरमान्यांची सोय झाली.

अनारक्षित फेऱ्यांमुळे प्रवासी समाधानी
परतीच्या प्रवासात येथील रेल्वेस्थानकात चाकरमान्यांची उसळलेली गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच खेड-पनवेल अनारक्षित स्पेशलच्या सहा फेऱ्या चालवल्या. त्यामुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यास मदत झाली. विशेष फेऱ्यांना गणेशभक्तांचा उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे उत्पन्नात भर पडली. यंदा कोकण रेल्वेमार्गावर विशेष भरारी पथक तैनात करण्यात आल्याने रेल्वेस्थानकात प्रवेश करतानाच अनेकांनी प्लॅटफॉर्म तिकीट घेणे पसंत केले. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटातूनही रेल्वे प्रशासनास सर्वाधिक उत्पन्न मिळाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 01/Oct/2024