रत्नागिरी : रत्नागिरी आकाशवाणीवरील लोकप्रिय आवाज बनलेले सेवा निवृत्त निवेदक सुरेश भावे यांचे काल 26 जानेवारी रोजी सायंकाळी ८ च्या दरम्याने पुणे येथे दुःखद निधन झाले आहे.
निवेदक म्हणून कार्यरत असताना त्यांनी हभप. सुरेश भावे म्हणून सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणूनही ख्याती प्राप्त केली होती. सामाजिक कार्याचा वसा जपताना त्यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे पार्थिव २७ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.
2 दिवसापूर्वी 24 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता. भावे यांच्या निधनाने एक चांगला व्यासंगी कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची, तसेच रत्नागिरी आकाशवाणीची ओळख ठरलेला आवाज हरपल्याची भावना आकाशवाणी श्रोतृवर्ग आणि कला क्षेत्रातून उमटत आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते, पार्शवसूचक (प्रॉम्प्टर), सूत्रसंचालक, दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, मेकअप मन, आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे निवृत्त निवेदक, कलाकार, कीर्तनकार ह.भ.प. सुरेश सीताराम भावे अशी त्यांची बहुआयामी ओळख होती.
सुरेश भावे यांचा जन्म रत्नागिरी येथे आजच्या दिवशी म्हणजेच 24 जानेवारी, 1946 रोजी सामान्य कुटुंबात झाला. शालेय शिक्षण विजयदुर्ग व वाडा येथे तसेच, इयत्ता नववीपासून रत्नागिरीतील फाटक हायस्कूल मध्ये झाले. त्यानंतर रत्नागिरीतील आय. टी. आय. मधून इलेक्ट्रिशियन चा कोर्स पूर्ण केला आहे. शालेय जीवनात स्नेहसंमेलनात (गॅदरींगमध्ये) अभिनय सादर करत असत.
लहानपणापासून म्हणजे वयाच्या नवव्या वर्षापासून म्हणजे सन 1955 सालापासून रंगदेवतेची सेवा करत आहेत. सामान्यपणे 25 – वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत होते.
सुरेश भावे यांनी रंगभूमीवरील पहिले काम ते सातवी इयत्तेत शिकत असताना संगीत शारदा नाटकातील शारदेच्या भूमिकेने सुरू केले. त्याचवर्षी संगीत देवता या नाटकातील पदूची भूमिका व काही अडचणींमुळे मुख्य नायिकेची भूमिका त्यांनी सादर केली होती.
त्यानंतर ए. के. केळकर हायस्कूल, वाडा इथे इये मराठीचिये नगरी या लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित नाटिकेत स्त्री भूमिका साकारली. I. T. I. मध्ये शिकत असताना भालबा केळकर लिखित बिचारा डायरेक्टर, बेपत्ता या एकांकिका दिग्दर्शनासह सादर केल्या होत्या. सामानाची अनुलब्धता व दळणवळणाच्या मर्यादित सुविधा यामुळे सुरेशरवांच्या काळात नाटक सादर करणे व त्यासाठी सेट अथवा अनुषंगिक सामान असणे किंवा मिळवणे ही एक तारेवरची कसरतच असायची.
त्याबरोबरच त्यावेळेस स्त्री भूमिकांसाठी अभिनेत्री मिळणे हीसुद्धा एक कठीण गोष्ट असायची. परंतु सन 1972 पासून सुरेश जींच्या पत्नी सौ. शोभाताई ह्या भूमिका पार पाडत.
सुरेशजी स्वतः इलेक्ट्रिशियन (Permit Holder) असल्याने तसेच बऱ्याच नाटकांना दिग्दर्शन केल्याने नाटका दरम्यान ते बहुतांश भूमिका (मेकअप, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत यांसारख्या) पार पाडत असत. यादरम्यान त्यांनी मेकअप साठीचे जरूर ते ज्ञान रत्नागिरीतील तत्कालिन मेकअप मन पेंटर बाळ सोहनी, पेंटर सोहनी (नंदू सोहनी यांचे वडील), बाबल्या बसणकर, सावंत, रामाणे यांचेकडून शिकून घेतले.
आपली अभिनय कला सादर करत असेपर्यंत सुरेशराव यांनी जवळपास 30 ते 35 नाटकांमध्ये आपली अभिनय कला सादर केली आहे. त्यामध्ये प्रेमा तुझा रंग कसा, तुझे आहे तुजपाशी, मुंबईची माणस, भोवरा, अपराध मीच केला यांसारख्या त्याकाळात गाजलेल्या नाटकांमध्ये तसेच, गंगाधर गाडगीळ लिखित बहुतांश सर्व नाटिका उदाहरणार्थ बंडू नाटक करतो. स्वप्नांची वजाबाकी. बंडू आजारी पडतो, वगैरे.
रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतन येथे काही काळ सेवा त्यांनी केली आहे. सेवाकाळात याजसाठी केला होता अट्टाहास हे तीन अंकी नाटक तंत्रनिकेतनमधील सहकाऱ्यांसोबत सादर केले होते. सन 1964 ते 1974 या दहा वर्षांच्या कालावधीत तंत्रनिकेतनमधील गॅदरींग मध्ये सादर होणाऱ्या नाटकांचे तसेच एकांकिकांसाठीचे दिग्दर्शन व अभिनय ही करत होते.
पॉलिटेक्निकमध्ये तो मी नव्हेच या नाटकाचा तीन अंकी प्रयोग सादर केला होता. सदर नाटकात चन्नाची भूमिका सुरेश यांनी निभावली होती. त्याचदरम्यान नटवर्य प्रभाकर पंत पणशीकर रत्नागिरीत त्यांचे नातेवाईक डॉ. शरदचंद्र कुलकर्णी यांचेकडे विश्रांतीसाठी आले होते. त्यांचेकडून दिग्दर्शनाचा लाभ सुरेशरावांना मिळाला.
तसेच दिवा जळू दे सारी रात या नाटकासाठी रमेश चौधरी सर यांनी दिग्दर्शन केले होते तर दुरितांचे तिमिर जावो या नाटकासाठी नटवर्य शंकर घाणेकर यांचे दिग्दर्शन लाभले होते.
सन 1970 ते 1977 याकाळात बांधकाम खात्याच्या (B & C – P. W. D.) श्री गणेशोत्सव कालावधीत सादर केल्या जाणाऱ्या नाटकांमध्ये पाहुणा कलाकार (Guest Artist) म्हणून अभिनय सादर करण्याची संधी सुरेशरावांना मिळत असे. शहरातील बहुतेक गणेशोत्सव किंवा समारंभानिमित्ताने सादर होणाऱ्या नाटकांसाठी अभिनय व दिग्दर्शनाची जबाबदारीही ते पार पाडत असत.
सन 1977 सालापासून सुरेश जी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात निवेदक म्हणून सेवा करू लागले. नोकरीतील शिफ्ट ड्युटीमुळे रंगभूमीवरील नाटकांकडे सन 1982 पासून दुर्लक्ष करावे लागले. मात्र आकाशवाणी कलाकार म्हणून श्रुतिका, नभोनाट्य, रूपके या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांकडे अधिक लक्ष पुरवावे लागत असे.
अभिनय जरी थांबवावा लागला तरीही रंगभूमीची सेवा वेगळ्या म्हणजेच निवेदनाच्या भूमिकेतून निवेदक म्हणून कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असत.
आजच्या इतकी आधुनिक यंत्रणा त्यावेळेस उपलब्ध नव्हती. त्यामुळे टेपरेकॉर्डर हेच एकमेव साधन रेकॉर्डिंग व इतर गोष्टींसाठी उपलब्ध होते. (सुरूवातीला तेही दुर्मीळच कारण अगदी ठराविक लोकांकडेच टेपरेकॉर्डर असायचा).
नाटक उभे रहाण्यासाठीची पूर्व तयारीही कित्येक वेळा पार पाडावी लागत असे. (यामध्ये थिएटर उभारण्यासाठी जमिनीत नेम काढणे, चिवे, बांबू, पडदे, इत्यादि सामान आणणे व पोचविणे). रेकॉर्डिंग साठी विशेष करून रेकॉर्डिंग नीट होण्यासाठी व जे Effects मिळायला हवेत त्यासाठी तसेच पार्श्वसंगीताचे ध्वनीमुद्रण शांततेत रात्री 11 नंतर करावे लागत असे.
सुरेशराव यांना स्वतःला संगीत क्षेत्राची थोडीफार ओळख असल्यामुळेच तीन चार नाटकांचे पार्श्वसंगीत त्यांनी प्रत्यक्षच दिले होते.
सुरेशरावांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक कलाकारांबरोबर काम के तसेच जरी स्वतः दिग्दर्शन करत होते तरीही काही दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची ही संधी मिळाली.
तो मी नव्हेच या नाटकाचा प्रयोग गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील खातू नाट्य मंदिर येथे सुरू असताना कंपनीचा तबलजी आजारी पडला. या प्रयोगाला सुरेशराव सपत्नीक नाट्य मंदिरात उपस्थित होते. यावेळेस सुरेशरावांना यासाठी साथसंगत करण्याची आयोजकांनी केली. दुसऱ्या व तिसऱ्या अंकाच्या विश्रांती काळातील सरावावर तबला साथ करून तो प्रयोग निभावणे शक्य झाले.
दरम्यान कीर्तन कलेचा अभ्यास करून कीर्तन कलाही सुरेशराव सादर करतात. अभिनय कला यात त्यांना उपयोगी पडते. आजपर्यंत अनेक कीर्तने त्यांनी सादर केली आहेत.
रसिकवृंद व स्वरूप कला मंडळ या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. परंतु त्या अल्पायुषी ठरल्या.
पावसचे संत परमहंस स्वामी स्वरूपानंद यांची प्रत्यक्ष सेवा करण्याचे भाग्य सुरेशजींना लाभले आहे. स्वामींचे अनुग्रहित आहेत. स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्म तारखेनुसार व समाधी दिनांकानुसार रत्नागिरीत ते श्री विठ्ठल मंदिर ते स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ कार्यालयापर्यंत शाळकरी मुलांच्या दिंडीचे आयोजन काही वर्षे रत्नागिरीत केले होते. स्थानिक अनेक कलावंतांबरोबर त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 27-01-2025













