रत्नागिरी : तालुक्यातील तरवळ कुळ्येवाडी येथील शेतकरी शांताराम नामदेव कुळ्ये यांच्या मालकीची गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली असून या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरवळ गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तरवळ आगवे परिसरात रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे फारच धोक्याचे बनले आहे या भागात दिवसा दिवसाढवळ्या हा बिबट्या अनेकांना आढळून आला आहे. तसेच रात्रीच्या वेळी घराभोवती भक्ष्यासाठी तो अलिकडे सातत्याने येऊ लागला आहे. २४ जानेवारी रोजी तरवळ कुळ्येवाडी येथील गरीब शेतकरी शांताराम नामदेव कुळ्ये यांच्या मालकीची गाय बिबट्याने ठार केली असून या गायीच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्याला मानसिक धक्काही बसला आहे. जीवापाड शेतकरी वर्ग गाईगुरांची आपल्या मुलासारखी काळजी घेत असतो. असे असताना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अशा गाईंचा मृत्यू होत असेल, तर शेतकऱ्यांनी गाई गुरे कशासाठी पाळावीत? असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा राहिला आहे. तरी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाने भरपाई द्यावीच, आणि बिबट्याचाही वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:00 PM 28/Jan/2025













