संगमेश्वर : जिल्ह्यात गेले दोन दिवस प्रचंड उष्मा जाणवत होता. हवामान विभागाकडूनही पावसाचा अंदाज वर्तविलेला होता. तो खरा ठरला असून तुरळ, धामणी या परिसरात दुपारी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
मागील आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली होती. सलग दोन दिवस कडकडीत उन पडलेले होते. वाढत्या उष्म्यापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत होती. काल दुपारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यात तुरळ धामणी परिसरात जोरदार पाऊस झाला. त्याचवरोबर सायंकाळपर्यंत चिपळूण, खेड तालुक्यांतही पाऊस कोसळत होता. पावसामुळे बाहेर पडलेल्या लोकांची व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते. खड्यात पाणी साचल्यामुळे त्यामधून वाहने चालवताना चालकांची कसरत सुरू होती. काही शेतकऱ्यांनी कापलेले भात पावसात भिजले आहे. त्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान होणार आहे.
सावर्डे परिसरालाही दणका
सावर्डे परिसरात मंगळवारी (ता. १) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गेले दोन दिवस आकाश निरभ्र होते. हळवी भातशेती कापणीस आली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आजच्या पावसाने कापलेले भात भिजले आहे. शेतकऱ्यांबरोबर घराबाहेर पडलेल्या ग्रामस्थांची पावसाने तारांबळ उडाली. सायंकाळी सुमारे अर्धा तास पाऊस पडला. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 02/Oct/2024
