रत्नागिरी : जिल्ह्यात आगोटची लगबग.. सुकी मासळी खातेय ‘भाव’

रत्नागिरी : जून-जुलै महिना जवळ येत असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील लोकांची आगोटच्या तयारीसाठी धावपळ सुरू झाली आहे. पावसाळ्यात खाद्यपदार्थांची अडचण होऊ नये यासाठी एप्रिल ते मे महिन्यात विविध पदार्थ साठवून ठेवले जात आहेत. या खरेदीमध्ये सुक्या मासळीचे महत्त्व वाढलेले आहे. यंदा मासळीच कमी असल्यामुळे सुक्या माशांचे दर वाढले आहेत.

शहरात तिखटासह अन्य गरम मसाले तयार करणाऱ्या चक्क्यांमध्ये मिरची पावडर बनवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महिलांची गर्दी वाढलेली आहे. गणपतीपर्यंत मसाल्याचे पदार्थ, सुकी मासळी व इंधनाची कमतरता भासू नये याकरिता पावसाळा सुरू होण्यापूर्वी विशेष काळजी घेतली जात आहे. पावसाळ्यामध्ये सुकी मासळी मिळत नाही. त्याची व्यवस्था आतापासूनच केली जात आहे. चार ते पाच महिन्यांसाठी लागणारी सुकी मासळी खरेदीसाठी स्थानिकच नव्हे तर मुंबईकर चाकरमानीही सरसावलेले आहेत. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काही खवय्येही कोकणात दाखल होत आहेत. सुकी मासळी साठवण्यासाठी महिला अधिक आग्रही असतात. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी गेल्या काही वर्षात वाढलेली आहे. त्यामुळे या मासळीचे दर वधारलेले आहेत.

मत्स्य प्रजोत्पादनाचा काळ लक्षात घेत शासनाकडून दरवर्षीच १ जूनपासून पुढील २ महिने मासेमारी बंद असते. त्यामुळे या काळात ताजी मासळी मिळत नसल्याने खवय्यांना सुक्या मासळीचा आधार होतो. नियमित खाण्यासाठी माशांची उपलब्धता होत नसल्याने सुक्या मासळीचा भाव वाढलेला आहे. रत्नागिरी शहरातील आठवडाबाजार आणि आयटीआय-नाचणे रोड येथे भरणाऱ्या बाजारात सुक्या मासळीच्या बेगमीसाठी शहरी व ग्रामीण भागातील लोकांची गर्दी वाढली आहे.

सुक्या मच्छीपेक्षा अलिबाग, गुजरात येथून आलेल्या सुक्या मासळीला ग्राहक प्राधान्य देत आहेत. प्रत्येक ग्राहक तीन ते चार किलोची मासळी खरेदी करत आहे.

सुक्या मासळीचे दर
सुक्या मासळीचे प्रतिकिलो दर सुकेसोडे-१ हजार ६०० प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. सुके बोंबील ५२० ते ५६० रुपये प्रतिकिलो, खारा बांगडा २० रुपयांना एक नग, सुकी आंबड – ६०० रुपये प्रतिकिलो दर, सुका कोलीम-२५० ते ३०० रुपये किलो, सुकी बगी- ७०० रुपये किलो, बला सुकट-४०० ते ४५० किलो, चेवना-४०० रुपये किलो, सुकी काड- ४४० ते ६४० रुपये किलो, सुकी म्हाकुळ ६०० रुपये प्रतिकिलो, सुकी मांदली-१०० रुपये वाटा, सुकी लेपा १५० रुपये वाटा, सुकी ढोमी २०० रुपये वाटा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 PM 25/Apr/2025