रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड दुर्गवळीवाडी येथील सव्वीस वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 24 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ओंकार अनिल दुर्गवळी (वय वर्षे 26 राहणार मालगुंड दुर्गवळीवाडी) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, गुरुवारी 24 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ओंकार हा घरातून बाहेर पडला होता. यावेळी अधिक वेळ झाल्यानंतर तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. याचवेळी मालगुंड दुर्गवळीवाडी येथे सुनील राजाराम साळवी यांच्या मालकीच्या असलेल्या विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आल्यानंतर काही ग्रामस्थ त्या विहिरीच्या ठिकाणी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. यावेळी ओंकार हा विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती त्याच्या घरच्या कुटुंबांना आणि वाडीतील इतर ग्रामस्थांना दिल्यानंतर आलेल्या वाडीतील इतर ग्रामस्थांना दिल्यानंतर आलेल्या ग्रामस्थांनी विहिरीत पडलेला तरुण हा ओंकारच असल्याची खात्री केली.
याबाबतची माहिती गणपतीपुळे पोलीस चौकीच्या पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी येऊन घटनास्थळी पाहिले असता ओंकार हा तरुण सुमारे 80 फूट खोल विहिरीत पडल्याचे पहिले. या घटनेचा पंचनामा शुक्रवारी २५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास गणपतीपुळे पोलिसांच्या वतीने करण्यात आला. याबाबत जयगड पोलीस ठाण्यातआकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ओंकार हा अविवाहित होता परंतु कुटुंबाचा तो मोठा आधारवड ठरला होता. मार्केटिंगचे काम करून त्याने आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या पश्चात वडील, आजी भाऊ व अन्य नातेवाईक असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण मालगुंड दुर्गवळीवाडी परिसर आणि त्याच्या मित्र परिवारातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:33 PM 25/Apr/2025














