पोलिसांनी गावागावांत सर्च ऑपरेशन राबवावे : हिंदू जनजागृती समिती

चिपळूण : सर्वप्रथम खेडा येथे बांगलादेशी घुसखोर सापडले. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक करून काहीअंशी तपास केला. मात्र, त्या पुढील तपास झालेला नाही. या लोकांकडे पासपोर्ट आहे, अन्य कागदपत्रे आहेत. ती त्यांना कशी मिळाली? अनेक बनावट कागदपत्रे त्यांनी तयार केली आहेत. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून बांगलादेशींना ताब्यात घ्यावे व कठोर कारवाई करावी. अन्यथा देशाची सुरक्षा धोक्यात येईल, असे मत हिंदू जनजागृती समितीने चिपळुणातील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद भुरण यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समितीच्या माध्यमातून शासनाचे बांगलादेशी घुसखोर नागरिकांच्या संदर्भात लक्ष वेधण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम २३ ऑक्टोबर २०२३ ला चिपळूण येथे दहशतवाद विरोधी पथकाच्या एका शाखेने खेडामधील बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी संबंधित त्याच्या दोन मुलांनाही ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या परिवारातील इतरांना ताब्यात घेतले नाही. गेली बारा वर्षे त्याची पत्नी आणि मुलांसह तो खेर्डी येथे राहात होता.

मात्र, पोलिसांनी या बाबत योग्य तपास केला नाही. त्यामुळे घुसखोर व त्याच्या दोन मुलांना जामीन मिळाला. घुसखोरी करणाऱ्याला जामीन मिळतो ही अतिशय गंभीर बाब आहे. मात्र, पोलिसांनी जामीन रद्द होण्यासाठी काहीही केले नाही तर घुसखोरी करणाऱ्याला जामीन देण्यासाठी मालेगाव येथील मोलमजुरी करणारा एक नागरिक आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
त्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैध वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले.

योग्य कागदपत्राशिवाय ते भारतात प्रवेश करून चिरेखाणीवर काम करीत होते. यापैकी एका घुसखोराला रत्नागिरी जवळील शिरगाव येथे जन्म दाखला देण्यात आला होता. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे एक बांगलादेशी महिला गेल्या आठ वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. तिने वास्तव्यादरम्यान आधार कार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे तयार केली व विवाह देखील केल्याचे उघड झाले आहे. तिच्या नावावर शहरात मालमत्ता खरेदीचा प्रकारही उघड झाला आहे. अशाप्रकारे बांगलादेशी घुसखोर भारतात बेकायदेशिरपणे प्रवेश करून बांधकाम क्षेत्र, मच्छीमारी, रोजंदारी या माध्यमातून झोपडपट्टीत वास्तव्य करतात. शासनाने जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवावी, सर्व तालुके, शहरे, गावे व संशयित ठिकाणी कोम्बिंग व सर्च ऑपरेशन करून घुसखोरांना शोधून काढावे, बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे शोधून संबंधित घुसखोरांना सहकार्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 30/Jan/2025