रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) स्वरूप योगिनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीतील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे, दिव्यांगांसाठी कार्यरत आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे आणि उद्योजिका सुनीता गोगटे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या गुरुवारपासून ३ ते ५ ऑक्टोबर कालावधीत या पुरस्कारांचे वितरण शहरातील वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमालेदरम्यान करण्यात येणार आहे.
स्वरूपानंद व्याख्यानमालेत ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता नामयाची जनी (संत जनाबाई समाधी ६७५ वे वर्ष), ४ रोजी पुण्यश्लोक महाराणी (अहिल्यादेवी होळकर यांचे जन्माचे त्रिशतकी वर्ष), ५ ला वीरांगना महाराणी दुर्गावती (महाराणी दुर्गावतीच्या ५०० व्या जन्मवर्षाची सांगता) यावर श्रीनिवास पेंडसे व्याख्यान देणार आहेत. पहिल्या दिवशी डॉ. शिंदे, दुसऱ्या दिवशी पाथरे व तिसऱ्या दिवशी गोगटे यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
कोकणात वंध्यत्व निबारणाच्या कार्यासाठी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल नीलेश शिंदे काम करत आहेत. डॉ. शिंदे यांनी कोकणातील पहिले रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर २०१४ साली सुरू करून अनेक महिलांना अपत्य प्राप्तीसाठी एक आशेचा किरण दाखवला.
सुरेखा देवराम पाथरे यांनी सुरुवातीला जि. प. सामाजिक शास्त्रज्ञ व जलस्वराज्य प्रकल्पात महिला सक्षमीकरण अधिकारी म्हणून काम केले. त्यांचा मुलगा स्वमग्न आहे, हे समजल्यानंतर आस्था सोशल फाऊंडेशनची स्थापना करून दिव्यांगांसाठी काम सुरू केले. स्वमग्न, मूकबधीर अशा विविध दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन हे ध्येय घेऊन कार्य सुरू आहे.
सुनीता यशवंत गोगटे या मावळंगे गावच्या रहिवासी असून कोकणी मेवा उद्योजिका आहेत. लघुउद्योगामध्ये कामगार वर्गाबरोबर सहकारी, मैत्रिणीचं नातं जपले आहेत. विभक्त कुटुंबे वाढत असली तरी एकत्र कुटुंब पद्धतीचा अंगीकार करून समाजाचे प्रबोधन त्या करतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 02/Oct/2024
