रत्नागिरी : ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवती मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रंगरंगोटी, आकर्षक पताका लावल्या असून विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
येथील मंदिरात ३ ऑक्टोबरला सकाळी घटस्थापना व देवीची आरती होईल. ४ ऑक्टोबरला सकाळी ९ ते १० या वेळेत संजीवन गुरूकुलचे विद्यार्थी भजनसेवा करतील. ५ ला सायंकाळी ७ ते ८ या वेळेत श्री दत्तमंदिर मंडळ तळेकरवाडी यांचे भजन, ६ ला सकाळी श्री सुक्त पाठ, कथ्थक नृत्य सादरीकरण, सकाळी ११ व संध्याकाळी ४ वा. जय भवानी महिला मंडळाचे भजन आणि सायं. ७ वा. श्री सांब सेवा मंडळ पेठकिल्ला यांचे भजन होईल. ७ व ८ ऑक्टोबरला नित्यपूजा, आरती आदी कार्यक्रम होतील. ९ ला भगवती स्पोर्ट्स राजवाडी आयोजित ढोलवादन स्पर्धा रात्री ८ ते १० या वेळेत होईल. १० ला दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ११ ला रात्री १२ वा. देवीचा गोंधळ व १२ ला दसऱ्याच्या दिवशी दुपारी १२ वा. घट विसर्जन व देवीची आरती असा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ वा. सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल.
श्री भगवती देवीची पौराणिक कथा आहे. या देवीने रत्नासुराचा वध करून रत्नागिरीत वास्तव्य केले आणि रत्नागिरी हे नाव प्रचलित झाले. तेव्हापासून देवीचे १२ मानकरी आणि ग्रामस्थ भक्तीभावाने नवरात्रोत्सव साजरा करत आहेत. उत्सवात श्री भगवती देवीची दररोज पहाटे पूजा केली जाते. भक्तांकडून देवीला मिळालेली साडी देवीला नेसवली जाते. पहाटे व दुपारी १२ वा. असा दोनवेळा नैवेद्य दाखवला जातो. रात्री पुन्हा साडी नेसवली जाते. १० दिवस असा दिनक्रम चालू असतो. भाविकांची गर्दी सातव्या व नवव्या माळेला होत असते. नवव्या माळेच्या दिवशी भाविकांचा उत्साह भरपूर असतो. दुपारी १२ वा. कुमारी मुलींचे पूजन केले जाते. ओटी भरून ५ प्रकारची फळे दिली जातात. रात्री गोंधळ घातला जातो त्यानंतर देवीचा आराबा बाहेर पडतो. त्यासोबत निशाण, अब्दागीर, लवाजमा असतो. वर्षातून दोनवेळा किल्ल्याच्या सात बुरूजांना नारळ दिला जातो. एक शिमगा पंचमी आणि दुसरा नवरात्रपंचमीला नवव्या माळेच्या रात्री लवाजम्यातील लोक हे नारळ देतात आणि रात्री निशाण देवळात परत येते. त्यावर पाणी घातले जाते. त्यानंतर दिवट्या पाजळवल्या जातात.
किल्ल्यावर प्रचंड गर्दी
नवरात्रोत्सवात भगवती किल्ल्यावर प्रचंड गर्दी असते. या कालावधीत परजिल्ह्यातील पर्यटकही उपस्थित राहतात. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने दर्शनरांगांची व्यवस्था केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 02-10-2024
