राजापूर : राजापूर तालुक्यात महावितरणकडून फॉल्टी मीटर बदलणाच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी याला आक्षेप घेत, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी प्रत्येक गावातील ग्रामसभेत ग्रामस्थांना या स्मार्ट मीटरबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी, नंतर स्मार्ट मीटर बसविण्यात यावेत, अशी मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
राज्यातील बहुतांश ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध होत असताना राजापूर तालुक्यात वीज वितरण विभागाकडून मीटर फॉल्टी असल्याचे सांगून नवीन स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी शिवसेना तालुकाप्रमुख नागले यांच्याकडे काही नागरिकांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागले यांनी मंगळवारी वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. स्मार्ट मीटरी कार्यपद्धती, त्याचे फायदे-तोटे याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता, मनमानी करून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वीज वितरण विभागाने तत्काळ थांबवावे, अशी मागणी नागले यांनी यावेळी केली.
ग्रामीण भागातील जनता आजही वीजबील ऑफलाईन पद्धतीने भरत आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर भविष्यात ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा करावयाचे झाल्यास सर्व गावांत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, अनेकांकडे मोबाईल देखील नाहीत, गावात बहुतांश वयोवृद्ध लोक वास्तव्याला आहेत, त्यांना ऑनलाईन बील भरणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी प्रत्येक गावातील ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना या मीटरबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक असल्यो नागले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
.. तर आरोग्य केंद्रातील वीजपुरवठा होईल खंडित
शाळा, शासकीय रुग्णालये व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये अनेकदा निधीअभावी वीजबिले वेळेत भरणा होत नाहीत. स्मार्ट मीटरमुळे वेळेत वीजबिल न भरल्यास एखाद्या आरोग्य केंद्रातील वीजपुरवठा खंडित झाला तर तेथील आरोग्य सेवेवर त्या परिणाम होणार असल्याचेही नागले यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 31/Jan/2025












