‘जीबीएस’चे रत्नागिरीत रुग्ण नाहीत, पण काळजी घ्यावी : डॉ. अनिरुद्ध आठल्ये

रत्नागिरी : जीबीएस (GBS) हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेवर परिणाम करते. या स्थितीचा परिणाम स्नायूंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते.

दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकते. या आजाराचे निश्चित कारण माहित नाही. हा आजार संसर्गजन्य नाही. GBS चे निदान प्रामुख्याने क्लिनिकल असते. हया आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होतात.

राज्याच्या विविध भागात जीबीएस आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी रत्नागिरी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, आरोग्य यंत्रणा या आजाराच्या पार्श्वभूमीवर ‘अलर्ट मोड’वर आहे.पुण्यासह इतर ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनानंतर या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने सर्वसामान्यांत भीतीचे वातावरण पसरत आहे. या आजारावर योग्यवेळी उपचार करून रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट आहे. नागरिकांनीही आजाराची काही लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

 रुग्ण कुठे आढळले?

जीबीएस आजाराचे रुग्ण पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूरसह इतर शहरांत आढळून आले आहेत.

 श्वास घेण्यास त्रास होतोय?

जीबीएस आजाराची लागण झाली आणि वेळेत उपचार घेतले नाहीत तर श्वास घेण्यासही त्रास होतो.

 वेळीच उपचार घेतल्यास

जीबीएस आजार हा सूक्ष्मजीव संसर्गानंतर होतो. अन्न किंवा इतर विषबाधेनंतरही होतो. वेळीच उपचार घेतल्याने रुग्ण लवकर बरा होतो.

 मज्जातंतूवर दुष्परिणाम

जीबीएस आजारात मज्जातंतूवर अधिक दुष्परिणाम होतो. त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहेत.

 लक्षणे काय?

या आजारात हात, पाय, मान, चेहरा आणि डोळ्यांत कमजोरी येते. चालताना,श्वास घेताना त्रास होतो. चावताना व गिळताना त्रास होणे.

 आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना:

जीबीएसचे इतर जिल्ह्यात आढळणारे रुग्ण पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना अशी लक्षणे असलेले रुग्ण तपासणीबाबत सूचना दिल्या आहेत.

 नागरिकांसाठी अवाहन:

जीबीएस आजाराचे रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेले नाहीत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी व अशी काही लक्षणे आढळ्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 31-01-2025