रत्नागिरी : काँग्रेसच्या रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखत प्रक्रिया झाली. पाचजण जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. निरीक्षक अजिंक्य देसाई यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची वर्दी लागणार याकडे लक्ष आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. महाविकास आघाडी म्हणून लोकसभेला सामोरे गेल्यानंतर लाड यांनी राजापुरात चांगली मेहनत घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य दिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला पक्षाकडून संधी मिळेल, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी आग्रही धरला
होता. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेनेच्या वाट्याला गेला. विद्यमान आमदार राजन साळवी यांना पुन्हा संधी देण्यात आली. यामुळे नाराज अविनाश लाड यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीबद्धल कॉग्रेस पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले आहे.
रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी निरीक्षक अजिंक्य देसाई रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यांनी इच्छुक असलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये हरिश शेखासन, सहदेव बेटकर, दीपक राऊत, अशोक जाधव, कॅ. हनिफ खलपे यांचा समावेश आहे.
गटातटांमुळे २० वर्षांमध्ये काँग्रेस रसातळाला
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची राजकीय स्थिती फार गंभीर आहे. गेल्या वीस वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी कोणतेच प्रयत्न झालेले नाही. गटातटाच्या राजकारामुळे पक्षाची जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. ज्या-ज्या पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या झाल्या. त्याला अडचणीत आणणे हाच दुसऱ्या गटाचा कार्यक्रम असतो. या पक्षांतर्गत हेव्यादाव्यामुळे कॉग्रेस पक्षाला जिल्ह्यात उभारीच मिळाली नाही. अजूनदेखील पक्षात तीच परिस्थिती आहे. परंतु, वरिष्ठदेखील हे वाद मिटविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाहीत, त्यामुळे आज पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 01/Feb/2025













