चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायत येथील बांगला देशी नागरिकाला जन्म दाखला दिल्याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीमार्फत एका व्यक्तीला जन्म दाखला देण्यात आला होता. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक केली व चौकशी करत असताना ग्रामपंचायतीने त्या व्यक्तीला बांगला देशी असताना सुद्धा जन्म दाखला दिल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाची पाळेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात. बांधकाम व्यवसाय, मच्छीमार व्यवसाय यामध्ये अनेक बांगला देशी नागरिक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत आहेत.
मालेगाव, नाशिक येथील बनावट जन्म दाखले चौकशी करण्याकरता शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक-नाशिक परिक्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी बनवली आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागाची एक स्वतंत्र विशेष तपास समिती निर्माण करावी किंवा नाशिक येथे निर्माण केलेल्या विशेष तपास समितीकडे कोकण विभागाचे कामही सोपवण्यात यावे, ज्यामुळे कोकण किनारपट्टीमध्ये जवळजवळ प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या बांगला देशी व रोहिंग्या नागरिकांची सखोल चौकशी होईल व कोकणातील समुद्रकिनारी घातपाताच्या प्रकाराला आवर घालता येईल. या प्रकरणी संबंधित प्रशासनाला तातडीने चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 03/Feb/2025














