रत्नागिरी : रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. खेड, दापोली हा भाग माझ्या लोकसभा मतदारसंघात येतो. विधानसभेला राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांच्याविरोधात काम केले असा आरोप केलेल्या कदम यांनी मला पत्र पाठविल्यानंतरच अभ्यास करेन आणि त्यांच्यासोबत चर्चाही करेन अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. ते माझे चांगले मित्र आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
रत्नागिरीत जिल्हा नियोजनच्या बैठकीला आलेल्या खासदार तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकत्यांनी योगेश कदम यांच्याविरोधात काम केले असा आरोप केला होता. त्यावर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता तटकरे यांनी त्याला उत्तर दिले. त्यामुळे तटकरे-कदम यांच्यात तू तू मैं मैं सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, खासदार तटकरे म्हणाले, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने राज्यात मोठे यश संपादन केले असून राज्यातील जनतेने आमच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आजतरी वाटत नाही. आमचा महायुतीत राहण्याचा निर्णय ठाम आहे. या मताशी सहमत कोणी असेल ते सोबत येतील. फलटणमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाविषयी तटकरे म्हणाले, संजीवराजे निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर यापूर्वी दादांना भेटून गेले आहेत. त्यांची चर्चा झालेली आहे. फलटण येथे आमच्या विचारांचा आमदार झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा होईल.
नाशिक, रायगडचा वाद लवकरच मिटेल
रायगडमध्ये पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. रायगड आणि नाशिकचा वाद लवकरच मिटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या दोन पक्षांनी एकत्र यावे की नाही हा त्यांचा अंतर्गत भाग आहे. संजय शिरसाठ हे मंत्री असून, पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे की कसे याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य नेते सांगू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
सागरी महामार्गावर नऊ मोठे पूल मंजूर
रत्नागिरीत जिल्हा नियोजनचा ८६० कोटींचा आराखडा तयार केला आहे. लवकरच अजितदादा बैठक घेतील, यावेळी आपण जास्तीतजास्त निधी द्यावा म्हणून मागणी करणार आहोत. सागरी महामार्गावरील नऊ मोठे पूल मंजूर झाले असून, त्यांच्या कामाला येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होईल. त्याचप्रमाणे सागरी महामार्गाच्या कामांचे टप्पे एकाचवेळी सुरू व्हावेत यासाठीही आपले प्रयत्न असणार असल्याचेही खासदार तटकरे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 03/Feb/2025














