चिपळूण : शहर परिसरातील व महामार्गालगत विनापरवाना बॅनर लावल्यास आता थेट गुन्हे दाखल होणार आहेत. न्यायालयाच्या सूचेननंतर चिपळूण नगर परिषद आता या नियमाची अंमलबजावणी कठोरपणे करणार आहे.
शहरामध्ये, तसेच मुंबई-गोवा महामार्गावर व लगत ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर, विविध कार्यक्रमांच्या जाहिरातींचे फलक लावले जातात. यामुळे अनेकदा अपघातदेखील घडत असतात. न्यायालयाने नगरपालिकांना यासंदर्भात कठोर निर्देश दिले आहेत. कलम १५५ नुसार असे अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर आता थेट गुन्हा दाखल होणार आहे. बॅनरवर ज्याचा फोटो असेल अशांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासंदर्भात चिपळूण न.प.ने नुकतीच बैठक घेऊन याबाबत संबंधितांना माहिती देण्यात आली.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी काही लोकप्रतिनिधी, बॅनर प्रिंटिंग व्यावसायिक यांना याबाबत माहिती दिली व या नियमासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, या बैठकीला पोलिस उपनिरीक्षक आढाव, चिपळूण न.प.चे कार्यालयीन अधीक्षक रोहित खाड्ये, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, मालमत्ता विभागप्रमुख सागर शेडगे आदी उपस्थित होते.
शहरातील शासकीय व खासगी जागेत बॅनर लावायचे असल्यास जागा मालकाच्या संमतीपत्रासह चिपळूण नगर परिषदेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी मिळालेला क्यू आर कोड जर बॅनरवर नसेल तर थेट गुन्हा दाखल होणार आहे, अशा मुंबई उच्च न्यायालयाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जाहीरात बॅनर झळकविणाऱ्यांवर गदा येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 04/Feb/2025












