रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा! संसदेच्या ‘संविधान भवनात’ श्रीरंग जोगळेकरचे प्रेरणादायी भाषण

रत्नागिरी : कोकणच्या मातीतील कलागुणांनी पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त गाजवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी भारतीय संसदेच्या ‘संविधान भवनात’ आयोजित विशेष समारंभात रत्नागिरीच्या श्रीरंग हेरंब जोगळेकर याला देशातील युवकांसमोर आपले विचार मांडण्याची सुवर्णसंधी मिळाली. संसदेत भाषणासाठी निमंत्रित करण्यात आलेला श्रीरंग हा रत्नागिरीतील तसेच संपूर्ण कोकण प्रांतातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.

राष्ट्रीय स्तरावर सलग दुसऱ्यांदा चमकला ‘रत्नागिरीचा हिरा’

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि NCERT यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५-२६’ मध्ये श्रीरंगला राष्ट्रीय स्तरावरील विशेष पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. अशा प्रकारचे पारितोषिक पटकावणारा तो रत्नागिरीतील पहिलाच स्पर्धक होता. या यशाची दखल घेत NCERT ने देशातील कला, क्रीडा, साहित्य आणि संशोधन अशा १६ विविध क्षेत्रांतील ३६ निवडक विद्यार्थ्यांमध्ये श्रीरंगची निवड केली. या निवडक विद्यार्थ्यांपैकी काही मोजक्या जणांना संसदेत भाषणाची संधी देण्यात आली, ज्यामध्ये श्रीरंगने आपल्या वक्तृत्वाने सर्वांची मने जिंकली.

विषय: “नो युअर लीडर” (Know Your Leader)

संसदेतील या कार्यक्रमाचा मुख्य विषय “Know Your Leader – Participation of Youth of Our Country in the events in the Parliament to pay homage to National Leaders on their Birth Anniversary” हा होता. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीरंगने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करत मांडलेले मुद्देसूद आणि आत्मविश्वासपूर्ण विचार ऐकून मान्यवरांनी त्याचे कौतुक केले.

“संसदेच्या ऐतिहासिक वास्तूत उभे राहून देशातील तरुणांसमोर बोलण्याची संधी मिळणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. या संधीबद्दल मी NCERT आणि शिक्षण मंत्रालयाचा अत्यंत ऋणी आहे,” अशा भावना श्रीरंगने व्यक्त केल्या.

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयासाठी सुवर्णयोग

श्रीरंग सध्या रत्नागिरीतील प्रतिष्ठित गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय) सुवर्ण महोत्सवी वर्षात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाच्या या खास वर्षात आपला विद्यार्थी सलग दोनदा राष्ट्रीय पातळीवर झळकावा, ही महाविद्यालयासाठी आणि संपूर्ण रत्नागिरीसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

कलाकाराचा वारसा आणि कठोर परिश्रम

श्रीरंगला कलेचा वारसा घरातूनच लाभला आहे. तो रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर आणि सुप्रसिद्ध गायिका सौ. श्वेता जोगळेकर यांचा सुपुत्र आहे. श्रीरंग स्वतः एक उत्तम ऑर्गन आणि हार्मोनियम वादक असून, अत्यंत कमी वयात त्याने संगीत क्षेत्रात नैपुण्य मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल रत्नागिरीतून तसेच सोशल मीडियावरून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.