रत्नागिरी : राजिवडा महिला संस्थेची मत्स्य विभागास नुकसानभरपाईची नोटीस

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये राजिवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थेची बांधकामेसुद्धा जेसीबीने जमिनदोस्त करण्यात आली. या कारवाईत संस्थेचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले असून ती भरपाई मागणीसाठी संस्थेने मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. प्रादेशिक उपायुक्तांसह मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, परवाना अधिकारी यांना नोटीस बजावण्यात आली असून नोटीस मिळाल्या असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिरकरवाडा बंदर परिसरातील अतिक्रमण गेल्या २७ आणि २८ जानेवारी रोजी हटविण्यात आले. या कारवाईत राजिवडा महिला मच्छीमार संस्थेची बांधकामे, स्वच्छतागृह, पाळणाघराचे बांधकाम पाडण्यात आले. यामधील इलेक्ट्रिक वस्तूसह खिडक्या, लाद्या अशा अनेक वस्तुंचे १७ लाख २४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या कारवाईमुळे संस्थेची प्रतिमा मलीन झाली त्याची भरपाई म्हणून ३ लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपयांची भरपाई म्हणून मागणी करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसायाचे प्रादेशिक उपायुक्त एन. व्ही. भादुले यांच्यासह मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर, आनंद पालव, प्रशिक्षण अधिकारी जे. डी. सावंत, परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी अॅड. अभिजीत कदम यांची दावापूर्व कायदेशीर नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. नोटीस प्राप्त झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत आर्थिक नुकसानीची रक्कम द्यावी, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 05/Feb/2025

Shiva optical