रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिऱ्या ते आंबा या पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ५६ किलोमीटरपैकी ३९ टक्के भागातील दोन्ही बाजूंचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच आंबा घाटात टनेलऐवजी दोनपदरी मार्ग बनविण्यात येणार आहेत. याला राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुजोरा दिला आहे.
मिऱ्या-कोल्हापूर मार्गातील मिऱ्या ते आंबा घाटातील काम रवी इन्फ्रा कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ९३० कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. पावसाळ्यापूर्वी आंबा घाटातील बरेचसे काम पूर्ण करण्यावर ठेकेदाराकडून भर देण्यात आलेला आहे. सध्या अर्ध्याहून अधिक घाटात खोदाई करून काँक्रिटीकरण केले गेले आहे, सुरुवातीला या घाटात दोन बोगदे करण्याचा विचार सुरू होता, मात्र चार वर्षांपूर्वी अतिवृष्टीत घाटात मोठ्याप्रमाणात भूस्खलन झाले होते. बोगद्यामुळे घाटातील भौगोलिक रचनेला धोका पोहोचण्याची शक्यताही वर्तविली जात होती. त्यानंतर बोगद्याबाबत फेरविचार सुरू होता, मात्र सध्या घाट परिसरात दुपदरी मार्ग उभारण्यावर शिक्कमोर्तब झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. घाटात १० मीटरचे दोन रस्ते, दीड मीटरचा दुभाजक आणि ७ मीटरचे सर्व्हिस रोड असे नियोजन केले आहे.
मिऱ्या ते आंबा या ५९ किमीच्या पहिल्या टप्प्यातील ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातील ३९ टक्के म्हणजेच साधारण २२ कि.मी.चे दोन्ही बाजूंचे काँक्रिटीकरण झाले आहे. या भागात २०० मोऱ्या उभारण्यात येणार आहेत. हे त्यातील १६८ मोऱ्यांचे काम पूर्ण झाले असून, ७ छोट्या पुलांपैकी ५ पुलांचे काम पूर्ण केले आहे.
करंजारी येथे टोलनाका उभारण्यात येणार आहे. तेथील इमारतीचे कामही सुरू आहे. दाभोळ येथे उड्डाणपूल होणार असून, त्यामुळे अंतर कमी होणार आहे. या मार्गावर ८०० कामगार दररोज काम करीत आहेत.
रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गाचे काम सुरू असल्यामुळे वाहन चालविणे अडचणीचे होत होते आणि वेळही अधिक लागतो, मात्र हा मार्ग पूर्ण झाल्यावर अडीच तासांत कोल्हापूर गाठणे वाहनचालकांना शक्य होईल. वेळेची बचत होणार असून, आर्थिक फायदाही होणार आहे. – गुरू सावंत, वाहनचालक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 10/Feb/2025













