रत्नागिरी : मूकबधिरांच्या सांकेतिक भाषेला भाषेचा दर्जा मिळावा. सांकेतिक भाषेतून शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे. तसेच सर्व परीक्षा, चाचण्या सांकेतिक भाषेतून असाव्यात. मूकबधीर दिव्यांगांच्या उपजीविका केंद्रासाठी जागा मिळावी, अशा मागण्या आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात करण्यात आल्या.
आस्था सोशल फाउंडेशनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त सांकेतिक भाषा दशा आणि दिशा – एक चिंतन यावर चर्चासत्र पार पडले. त्यावेळी या मागण्या मांडण्यात आल्या. कार्यकमात अभिव्यक्तीसाठी सांकेतिक भाषा वापरणाऱ्या मूकबधिर दिव्यांगांनी व पालकांनी व्यथा व्यक्त केल्या आणि शासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्राफिक्स डिझाइनिंगमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मूकबधीर विद्यार्थिनी ऋणाली गजानन बडद व गणेश मूर्तिकार साहिल महेंद्र खानविलकर या दोन्ही युवा दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आस्था सोशल फांउंडेशनच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी केले. सांकेतिक भाषा दुभाषक म्हणून निवृत्त मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला मूकबधीर दिव्यांग, त्यांचे पालक, आस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आस्थाचे वाचा उपचारतज्ज्ञ संकेत चाळके यांच्या नेतृत्वाखाली आस्थाच्या कार्यकर्त्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 02-10-2024