रत्नागिरी : सन्मित्र नगर येथील जलवाहिनीची चावी रस्ता डांबरीकरण करताना गायब

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वरचेवर होतच आहेत. हा बिघाड दुरुस्ती करण्यासाठी रस्त्याची खोदाई होत आहे. त्याचबरोबर सन्मित्र नगर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची चावीच रस्त्याचे डांबरीकरण करताना गायब झाली होती. ही चावी शोधून काढण्यासाठी त्याठिकाणी नव्यानेच केलेला रस्ता पुन्हा खोदावा लागला.
नवीन नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर अंतर्गत जलवाहिनी वेगवेगळ्या ठिकाणी फुटत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी रस्त्याची खोदाई करावी लागत आहे. मंगळवारी माळनाका येथे जलवाहिनी फुटल्याने तेथील रस्ता खोदावा लागला.

सततच्या या कामामुळे पाणी विभागाचा कर्मचारी वर्गही हैराण झाला आहे. सन्मित्रनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नव्हता. येथील रहिवाशांनी रत्नागिरी नगर परिषदेकडे तक्रारी केल्या. परंतु कर्मचारी वर्गाला बिघाड मिळत नव्हता. त्यावेळी तेथील रहिवाशांनी सन्मित्र नगरच्या उद्यानाजवळच्या तिठ्यावर पाणी सोडण्याची चावी होती, असे सांगितले. ही चावी रस्ता डांबरीकरणामुळे रस्त्याच्या खाली गेली होती. ती चावी आता रस्ता खोदून शोधण्यात आली आहे. त्यामुळे आता येथील पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 12/Feb/2025