एप्रिल ते जून दरम्यान सागरी मार्गावर धडक मोहीम; ७० हजार रुपयांचा दंड वसूल
पावस: पूर्णगड सागरी पोलिसांची कारवाई रत्नागिरी ते पूर्णगड या सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. या सागरी मार्गावर वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याने एक विशेष धडक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत एप्रिल ते जून या ३ महिन्यांच्या कालावधीत वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकी व चारचाकी अशा एकूण ८० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या सर्व वाहनचालकांकडून एकूण ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अपघातांचे सत्र रोखण्यासाठी पोलिसांचे पाऊल
रत्नागिरी ते पूर्णगड हा मार्ग निसर्गरम्य आणि सागरी किनारा असलेला मार्ग असल्याने या रस्त्यावर पर्यटकांच्या आणि स्थानिक वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, वेग मर्यादा न पाळणे आणि वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या मार्गावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत होते. या वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवणे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणे हाच या धडक मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
‘सागर कवच’ अभियान आणि नाकाबंदीमुळे शिस्त
पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यापासून पावस आणि संपूर्ण परिसर क्षेत्रात पोलिसांकडून कडक नाकाबंदी करण्यात येत आहे. विशेषतः ‘सागर कवच’ अभियानाच्या माध्यमातून सागरी सुरक्षेसोबतच रस्त्यावरील सुरक्षेसाठीही सातत्याने वाहनांची तपासणी केली जात आहे. अचानक घेतली जाणारी नाकाबंदी आणि वेगाने होणाऱ्या कारवाईमुळे वाहनचालकांना आता वाहतूक नियम पाळण्याची चांगलीच शिस्त लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
“वाहनचालकांना त्रास देणे हा आमचा उद्देश नाही…” “रस्ते अपघातात अनेकांना आपले नाहक जीव गमवावे लागतात. वाहनचालकांना केवळ त्रास देणे किंवा दंड वसूल करणे हा या मोहिमेचा अजिबात उद्देश नाही. तर प्रत्येक चालकाने नियम पाळून आपले आणि इतरांचे जीवन आनंदी व सुरक्षित जगावे, यासाठीच ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यामुळे आता अनेकांना नियम पाळण्याची सवय लागली आहे.” – महेश मुरकर, पोलीस अंमलदार, पूर्णगड
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 25-06-2026














