रत्नागिरी : चार किनार्‍यांवर प्रथमच आढळली कासवांची घरटी

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली असून, तिथे स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कासवांची वीण होणाऱ्या किनाऱ्यांची संख्या १६ वरून २३ झाली आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. यंदा ऑलिव्ह रिडले कासवांनी रत्नागिरीतील काही किनाऱ्यांना नव्याने जवळ करत काळबादेवी, अणसुरे (दांडे), आंबोळगड आणि गणेशगुळे किनाऱ्यांवर घरटी केली आहेत. यापूर्वी या किनाऱ्यांवर कासवाची घरटी आढळत नव्हती. रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचे १६ किनारे होते, आता त्यामध्ये नव्याने आणखी चार किनाऱ्यांची भर पडली आहे. आडे, मालगुंड आणि रोहिले या किनाऱ्यावरील यापूर्वी स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम पाहिले जात नव्हते. आडे किनाऱ्यावरील घरट्यांमध्ये सापडणारी कासवांची अंडी ही आंजर्ल्यात, मालगुंडची गणपतीपुळेमध्ये आणि रोहिलेची तवसाळ किनाऱ्यावर आणून त्या ठिकाणी संरक्षित केली जात होती; मात्र, यंदा कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाकडून या किनाऱ्यांवर स्वतंत्रपणे कासव संरक्षणाची मोहीम सुरू केली असून, संरक्षणासाठी स्वतंत्र ‘बीच-मॅनेजर’ची नियुक्ती केली आहे. नव्या किनाऱ्यांमधील काळबादेवी येथे पाच, अणसुरे (दांडे) येथे सात, आंबोळगड येथे सहा आणि गणेशगुळे येथे चार कासवांची घरटी आजतागायत आढळून आली आहेत तर आडे येथे तीन, मालगुंडमध्ये २१ आणि रोहिले येथे १२ घरटी आढळून आली आहेत.

स्वतंत्रपणे कासव संरक्षण
तीन किनाऱ्यांवर पूर्ण हंगामात तीन ते चार घरटी आढळत असल्यामुळे त्यातील अंड्यांना जवळच्या किनाऱ्यावर स्थानांतरित केले जात होते. अंडी स्थानांतरित करण्याच्या वेळेत बराच कालावधी जात असल्याने त्याचा परिणाम पिल्लांच्या जन्मदरावर पडत होता. २०२३-२४ च्या कासवविणीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्याच्या पिल्लांचा जन्मदर हा सिंधुदुर्ग आणि रायगडपेक्षा कमी होता. त्यामुळे घरट्यांची वाढलेली संख्या आणि घटणारा जन्मदर लक्षात घेऊन कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाने यंदापासून या तिन्ही किनार्‍यांवर स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम सुरू केले आहे.

दरवर्षीपेक्षा यंदा नव्याने समुद्रकिनाऱ्यांवर आढळलेल्या घरट्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. भरतीरेषा लक्षात घेऊन अंड्यांच्या सुरक्षेसाठी नैसर्गिक हॅचरी तयार केली गेली आहे तसेच कासवमित्र त्यावर लक्ष ठेवून आहेत. – किरण ठाकूर, कांदळवन कक्ष, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 12-02-2025