रत्नागिरी : जिल्ह्यातील १,६३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर

रत्नागिरी : राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्ग मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२३-२०२४ साठी २६७२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १६३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली असून ती त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे, यातून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक मजबूत व्हावी, या उद्देशाने समाजकल्याण विभागामार्फत गेले अनेक वर्षे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप दिली जाते. यापूर्वी ऑफलाईन असलेली पद्धत शासनाने ऑनलाईन करत लाभार्थी विद्यार्थ्याच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते.

महाविद्यालयामार्फतच विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. जिल्ह्यातील २६७२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. अपुऱ्या कागदपत्रामुळे २२२ अर्ज तात्काळ रद्द करण्यात आले. उर्वरित २४५० अजपैिकी दहा अर्ज छाननीत बाद झाले. एकूण १६४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली असून त्यापैकी ६३२ प्रकरणे प्रलंबित आहे तर १६३५ विद्यार्थ्यांना अंतिम शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.

यापूर्वी जिल्हास्तरावरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रक्कमेचे वाटप केले जात होते. परंतु राज्यभरातून विद्यार्थ्यांसह पालकांच्या तक्रारी आल्याने समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया ऑनलाईन करून थेट राज्यस्तरावरूनच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 13/Feb/2025