गुहागर : शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ व माहिती जलदगतीने तसेच पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी सरकारने राबविलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील ४३ हजार १८१ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. ही नोंदणी कमी प्रमाणात असली तरी जिल्ह्यात चिपळूण पहिल्या तर गुहागर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांनी लवकरात या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
अॅग्रीस्टॅक योजनेच्या अनुषंगाने नागरी सुविधा केंद्रावर (सीएससी) शेतकरी नोंदणी प्रक्रिया राज्यात २० जानेवारीपासून सुरू केली आहे. यासंदर्भात सर्व शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. पी. एम. किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल. पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे घेणे सुलभ होईल. पीक विमा व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण सुलभ होईल. किमान आधारभूत किंमतीवर खरेदीसाठी नोंदणी सुलभ होईल.
या योजनेमध्ये आतापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये चिपळूणमध्ये ६९०४ शेतकरी, गुहागर ६६४० शेतकरी, तीन नंबरवर संगमेश्वर ६४१८. शेतकरी, त्यानंतर खेड़ ६०८.४ शेतकरी, राजापूर ४५९७५ शेतकरी, लांजा ३४७३ शेतकरी, दापोली ३३२२ शेतकरी, मंडणगड २९५८ शेतकरी तर सर्वात कमी नोंदणी रत्नागिरीत २,८६० शेतकरी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही योजना आहे. भविष्यातील सर्व सेवा या नोंदणीच्या माध्यमातून सरकार देऊ शकते. गुहागर तालुक्यात ६५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे जास्तीत शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी, असे अवाहन गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे.
विनामूल्य करता येते नोंदणी
शेतकऱ्यांनी स्वतः चे आधारकार्ड, आधार संलग्न मोबाईल व खातेउतारा सोबत घेऊन जवळच्या नागरी सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्रावर विनामूल्य नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 14/Feb/2025














