खेड : तालुक्यातील तुळशी-धनगरवाडीतील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र, जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या पाणी योजनेमुळे ७८ वर्षांनंतर ग्रामस्थांची पाणी समस्या संपुष्टात आली आहे. दुर्गम भागातील तुळशी – धनगरवाडी येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. रस्त्याअभावी पाण्याचा टँकरही धनगरवाडीपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत होते.
ही बाब ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आमदार असताना निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत २ वर्षांतच रस्ते व पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गृहराज्यमंत्री कदम यांनी निधी उपलब्ध करून दिला.
निधी प्राप्त होताच नळपाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले. काम पूर्ण झाल्यामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या नळपाणी योजनेचा फायदा तुळशी-धनगरवाडी येथील १४ घरांना होणार आहे. ७८ वर्षांनंतर धनगरवाडीतील ग्रामस्थांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 15/Feb/2025














