रत्नागिरी : जागतिक वन्य जीव सप्ताहानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्यामार्फत बुधवारी दि. 2 रोजी वन्य जीव सप्ताहाला World WildLife Day प्रारंभ झाला.
यानिमित्त निसर्ग यात्रा, देवराई भ्रमंती, रत्नागिरी जिल्ह्यात आढळणाऱ्या ३०० हून अधिक प्रजातींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, वन्यजीव बचाव क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांचे मार्गदर्शन, शाळा महाविद्यालय जन जागृती अभियान असे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
हे कार्यक्रम वन विभाग, लेन्स आर्ट, सृष्टिज्ञान, रेन ट्री फाउंडेशन, रेस्क्यू पुणे, निसर्ग सोबती, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थांच्या सहभागातून आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी पोमेंडी (रत्नागिरी) येथील देवराई भ्रमंतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील अपार जैवविविधतेची आणि संपन्न अधिवासांची माहिती सर्वांना व्हावी आणि नागरिक, मुले, युवक यांना आपल्या परिसरात आढळणारे प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक, सरीसृप, फुलपाखरे, सागरी जीव तसेच त्यांचा अधिवास याबद्दल जागरूक करता यावे हे या कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील ३०० हून अधिक प्रजातींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लेन्स आर्ट या ग्रुपच्या माध्यमातून याप्रसंगी देवरूख येथील आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयातील स. का. पाटील सभागृहात ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान भरणार आहे. फोटोग्राफी आणि संवर्धन कार्यात लोकसहभाग वाढावा यासाठी रत्नागिरी आणि देवरूखमधील विविध शाळांमध्ये मार्गदर्शन आणि जनजागृती अभियान यानिमित्त सुरू करण्यात येणार आहे.
आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयात दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे चिपळूणच्या डीएफओ गिरीजा देसाई, एसीएफ प्रियांका लगड आणि रत्नागिरीचे आरएफओ प्रकाश सुतार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. हे छायाचित्र प्रदर्शन ६ ऑक्टोबरपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल. दि. ६ ऑक्टोबर रोजी पुणे येथील रेस्क्यू संस्थेचे संचालक डॉ नचिकेत उत्पट वन्य जीव बचावविषयक मार्गदर्शन करतील. हे व्याख्यान निसर्गभान व्याख्यानमालेच्या माध्यमातून यूट्यूबवर लाइव्ह पाहता येणार आहे. सकाळी ११ वाजता सह्याद्री संकल्प सोसायटीच्या यूट्यूब चॅनेलवर हे व्याख्यान ऐकता येणार आहे.
सर्व शाळा, महाविद्यालये, ग्रामस्थ, सुजाण नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी या अनोख्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रतीक मोरे (७७९८२३३२४३) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:18 PM 03/Oct/2024