रत्नागिरी : शालेय पोषण आहारात नव्याने १२ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संरचित आहार मिळण्यास मदत होणार आहे. व्हिजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मुगडाळ खिचडीसह अन्य विविध मेनू आहारात असणार आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहार अधिक चवदार व सकस मिळणार आहे.
यापूर्वी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविध १२ प्रकारच्या पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभदेण्यात येतो. या योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच तांदळापासून बनवलेल्या पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.
विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे वा पाककृतीमध्ये सुधारणा करण्याकरता लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था, बचत गट, योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने प्राप्त झाली होती, ही निवेदने व केंद्र शासनाने निश्चित केलेला प्रतिदिन प्रती विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता आहार पध्दतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणी साखर देता का साखर…
अंडा पुलाव आणि गोड खिचडी किंवा नाचणी सत्व या पाककृती पर्यायी स्वरूपात देण्यात येतील. शाळा व्यवस्थापन समितीला या दोन पाककृतीचा लाभ आणि अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. याकरता शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यासाठी शिक्षकांना आता कुणी साखर देता का साखर, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
अशी होणार कार्यवाही…
दोन आठवड्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या दिवसांसाठी पाककृती निश्चित केली आहे. प्रत्येक दिवशी कोणती पाककृती द्यायची याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 20/Feb/2025
