कोलकाता : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्या कारचा गुरुवारी (20 फेब्रुवारी) रोजी अपघात झाला. या कार अपघातातून सौरव गांगुली थोडक्यात वाचला आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर एक्स्प्रेस वे वर हा अपघात झाला.
या अपघातात गांगुलीला दुखापत झाली नाही.
सौरव गांगुली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बर्दवानला निघाला होता. दुर्गापूर एक्स्प्रेस वे वर दंतनपूर येथे त्यांच्या ताफ्यासमोर एक ट्रक अचानक आला. त्यामुळं सौरव गांगुलीच्या कारच्या ड्रायव्हरनं अचानक ब्रेक दाबला. यामुळं त्यांच्या मागं असलेल्या कारच्या चालकांनी देखील अचानक ब्रेक लावले. मात्र, यामुळं वाहनं एकमेकांना धडकली. यापैकी एक गाडी सौरव गांगुलीच्या कारला धडकली.
सौरव गांगुलीला या घटनेत दुखापत झाली नाही त्याप्रमाणं ताफ्यातील इतर व्यक्तींना देखील दुखापत झाली नाही. मात्र, गांगुलीला घटनास्थळावर 10 मिनिटे थांबावं लागलं. सौरव गांगुलीच्या ताफ्यातील दोन वाहनांचं अधिक नुकसान झालं आहे. या ठिकाणी थोडा वेळ थांबल्यानंतर सौहव गांगुली पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला. गांगुली बर्दवान विद्यापीठातील कार्यक्रमात सहभागी झाला.
सौरव गांगुली हा भारताचा आक्रमक कॅप्टन म्हणून ओळखला जातो. गांगुलीच्या कार्यकाळात भारतानं विदेशात मोठ्या संख्येनं सामने जिंकण्यास सुरुवात केली. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. सौरव गांगुलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11363 धावा केल्या. वनडेमध्ये त्याच्या नावावर 22 शतकं आणि 52 अर्थशतकं आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं सात हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2003 मध्ये गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं वनडे वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली होती. तर, त्यानं काही काळ बीसीसीआयचा चेअरमन म्हणून काम केलं आहे.
सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणून आक्रमक शैली वापरली. यामुळं विदेश दौऱ्यावर असताना जिथं जिथं भारताला पराभव स्वीकारावा लागायचा तिथं संघानं विजय मिळवून दाखवले. सौरव गांगुली नंतर बीसीसीआयमध्ये चेअरमन देखील होता. सौरव गांगुलीच्या काळात अनेक दिग्गज क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटमध्ये पुढं आले. गांगुलीनं त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडून चांगली कामगिरी करुन घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 21-02-2025
