रत्नागिरी : जिल्ह्यात फळांच्या मागणीत वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात मार्च अखेरबरोबर उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. परिणामी, उकाड्यातही वाढ झाली आहे. ऊन आणि उकाड्यापासून दिलासा मिळवण्याकरिता ग्राहकांची पावले थंड व रसाळ फळांकडे वळत आहेत. रमजान ईदमुळेही फळांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, द्राक्ष, संत्रे, मोसंबी, अननस या फळांना मागणी वाढली आहे. येथील बाजारामध्ये कलिंगड व टरबूज या फळांची ६० टेंपोची आवक झाली आहे. उसाच्या रसासह विविध प्रकारची शीतपेये पिण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे. मुस्लिम बांधव रोजा इफ्तार करताना फळांचा वापर करतात. त्यामुळे फळांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे.

सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, नगर तसेच मुंबईच्या वाशी मार्केटमधून रत्नागिरी जिल्ह्यात फळांची आवक होत आहे. टरबुजाला किलोला २० ते ३५ रुपये तर कलिंगडाची किंमत आकारानुसार साठ ते ऐंशी रुपयांपर्यंत वाढली आहे. फळांचा राजा हापूस आंब्याचेही आगमन झाले आहे. अडीच हजार रुपये डझन असा भाव आंब्याला मिळत आहे. मोसंबी, संत्री यांनासुद्धा चांगलीच मागणी आहे. मोसंबीची साताऱ्यात चार ते पाच टनं आवक होत आहे. संत्र्याला दर्जानुसार किलोला ३५ ते ७० रुपये भाव मिळत आहे.

द्राक्षाचा हंगामसुद्धा भरात आहे. द्राक्षाची आवक वाढली आहे. सांगलीवरून रोज द्राक्षाची आवक होत आहे. काळ्या द्राक्षांची विक्री ४० ते १०० रुपये किलो भावाने बाजारात होत आहे, अशी माहिती व्यापारी राकेश घोरपडे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 18/Mar/2025

Ratnagiri Khabardar add image