सूर्यमंदिराजवळील उत्सवास परवानगी न देण्यासाठी राजापूर पोलिसांना निवेदन

राजापूर : शहरातील मच्छीमार्केट परिसरात असलेल्या पुरातन सूर्यमंदिरामध्ये यापूर्वी कधीही कोणत्याही स्वरूपाचे उत्सव कोणीही करत नव्हते; मात्र तिथे धार्मिक कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. त्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी राजापुरातील हिंदू बांधवांनी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे.

हे निवेदन राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांना देण्यात आले असून, या वेळी महेश मयेकर, सूरज पेडणेकर, विनोद गादीकर, विवेक गुरव, कैलास कोठारकर, प्रसत्र देवस्थळी, निकेश पांचाळ, निखिल चव्हाण, अद्वैत अभ्यंकर यांच्यासह हिंदू समाजबांधव उपस्थित होते.

शहरातील मच्छीमार्केटजवळील पुरातन सूर्यमंदिर इ. स. वि. सन ७०० मध्ये सातवाहन राजाने बांधलेले असावे, असा अंदाज आहे.

या मंदिराचा उल्लेख हा सन १७१७ मधील बखरीत आढळून येतो. त्या मंदिराच्या उल्लेखानंतर २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राजापूरचा इतिहास या पुस्तकातही आहे. ते सूर्यमंदिर राष्ट्राची संपत्ती आहे. त्या मंदिर परिसरात यापूर्वी कधीही कोणत्याही स्वरूपाचे उत्सव विशिष्ट समाजाकडून केलेले नव्हते; मात्र आता धार्मिक कार्यक्रमासाठीच्या परवानगीचा अर्ज दिला गेला आहे. ते मंदिर पुरातन असून, हिंदू समाजाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 21/Feb/2025