रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्यावर सिमेंटमध्ये रोऊन लावलेला माहिती फलक काही समाजकंटकांनी तोडला आहे. हा गंभीर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, याबाबत शहर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
रत्नागिरी शहरापासून अवघ्या २ किमी अंतरावर रत्नदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढला असून, पायथ्याशी भगवती बंदर आहे. १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला. त्यांनी दक्षिणेला आणि जुन्या दरबाराच्या जवळ दोन ‘कमांडिंग पॉइंट्स’वर संरक्षक बुरूज बांधले होते. त्यामुळे या किल्ल्याची माहिती येणाऱ्या पर्यटकांना मिळावी, यासाठी बुरूज आणि इतर माहिती देणारे २१ फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते.
लोखंडी खांब सिमेंटमध्ये रोऊन हे फलक उभा केले आहेत. त्यापैकी एक फलक काही समाजकंटकांनी तोडला आहे. या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. भगवती किल्ल्यावर संपूर्ण सीसीटीव्हीची नजर आहे. त्यामध्ये दोघांचे हे कृत्य कैद झाले आहे. याची किल्ला संवर्धन समितीने गंभीर दखल घेतली असून, शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. या घटनेमुळे काहीसा तणाव निर्माण झाला असून, ठिकढिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत किल्ले संवर्धन समितीच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 22/Feb/2025
