गुहागर : सध्याच्या काळात प्रामाणिकपणा असणारी माणसे खूप कमी आहेत. मात्र, अशातही एस.टी. चालक अरविंद रेडीज यांनी शाळेत प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीची प्रवासादरम्यान हरवलेली सोन्याची रिंग तिला परत करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.
परचुरीतून सकाळी ६:१५ ला सुटणारी एस. टी. परचुरी गुहागर अशा दररोज जाणाऱ्या एसटी बसमधून हायस्कूल व महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करीत असतात. अशातच दोन दिवसांपूर्वी परचुरी सरपंच स्टॉप ते तळवली हायस्कूल असा प्रवास करणारी विद्यार्थिनी समायरा शाहनवाज चोगले ही तळवली या ठिकाणी उतरल्यानंतर आपल्या कानातील सोन्याची रिंग कुठे तरी पडली असल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर तिने लगेचच परचुरी येथे तिच्या आईला याबाबत माहिती दिली. परचुरी येथील सामाजिक कार्यकर्ते अब्रार चोगले यांना ही बाब सांगण्यात आली.
चोगले यांनी त्या दिवशी कर्तव्यावर असणारे चालक अरविंद उर्फ बाबू रेडीज यांच्याजवळ हरवलेल्या रिंगबद्दल सांगितले. यानंतर चालक रेडीज व वाहक यांनी बसमध्ये रिंग शोधून काढली. यानंतर ही रिंग स्वतः परचुरी येथे संबंधित विद्यार्थिनीच्या आई-वडिलांजवळ दिली. यावेळी परचुरीतील विलास गमरे, संतोष पवार, अब्रार चोगले, शाहनवाज चोगले यांसह अन्य उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 22/Feb/2025
