Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा अभियानांर्गत विरसई गावाला ५० लाखांचे पारितोषिक

दापोली : तालुक्यातील आदर्श गाव विरसई येथील ‘माझी वसुंधरा अभियान (Majhi Vasundhara Abhiyan) ४.० अंतर्गत विरसई ग्रामपंचायत कोकण विभागात प्रथम आली असून, ५० लाखांच पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थांचे अभिनंदन केले जात आहे.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान ४.० (Majhi Vasundhara Abhiyan) विरसई गावाला ५० लाखांचे पारितोषिक हे अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासनाच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार होते. या अभियानात पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या निसर्गाशी संबंधित पंचत्तत्त्वावर उत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षीस देण्यात येतात. कोकण विभागामध्ये दीड हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटामध्ये विरसई ग्रामपंचायत कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळाला असून, ५० लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

विरसई गावाने राज्य शासनाची आदर्श गावाची संकल्पना राबवून सर्वापुढे आदर्श निर्माण केला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची जिद्द यामुळेच गावाला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच मनोरमा राणे, कृषी विस्तार अधिकारी दिनेश राणे, ग्रामपंचायत अधिकारी विरेश कदम, मुंबई मंडळाचे सचिव सुरेश बेटकर, उपाध्यक्ष विठ्ठल माने, उपसरपंच विद्यार्थी जाधव, ग्रामीण कमिटी सचिव अनिल पिपळकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार धोत्रे, उपसचिव संदीप राणे, महिला मंडळाच्या सचिव सारिका राणे, ग्रामपंचायत सदस्या सुनीता जाधव तसेच उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आदींचे मार्गदर्शन लाभले.

राबवलेले उपक्रम
या अभियानात ग्रामपंचायतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवून पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबत पुढाकार घेतला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, फटाके बंदी, प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड, पुरातन वृक्ष संवर्धन, बायोगॅस, कंपोस्ट, शाश्वत शेती, जलसंधारण, ऊर्जा बचत, ओला कचरा सुका कचरा व्यवस्थापन यासारखे विविध उपक्रम राववण्यात आले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन साजरे करून त्याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 03/Oct/2024