चिपळूण : चिपळूणच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले माजी मंत्री व माजी आमदार स्व. पी. के. सावंत यांचे नाव पवन तलाव मैदानाला द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्फ बापू काणे यांनी नगरपालिका प्रशासन आणि आमदार शेखर निकम यांच्याकडे केली आहे.
काणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूणचे आमदार व मंत्री असताना स्व. बाळासाहेब सावंत यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली होती. भविष्याची गरज ओखळून कोकण आणि चिपळूणच्या विकासाचा पाया रचला. स्व. सावंत यांच्या माध्यमातून खेर्डी औद्योगिक वसाहत, चिपळूण पाणीयोजना, मध्यवर्ती बसस्थानक, परशुराम सहकारी साखर कारखाना, शासकीय दूधयोजना, ग्रामीण रस्ते व पूल उभारणे, दापोली कोकण कृषी विद्यापीठ, प्रत्येक गावात काजू वृक्ष लागवड, शहराची मार्कंडी ते आंबेडकर चौकपर्यंत हद्दवाढ, महाविद्यालयाची उभारणी आदी कामे मार्गी लावली.
गेल्या काही वर्षांत पवन तलाव मैदान विकसित झाले नव्हते. यासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेत निधी दिला. त्यामुळे दर्जेदार क्रीडांगण चिपळूणवासीयांना मिळाले आहे. मैदानाच्या चारही संरक्षण भिंत तसेच खेळाडूंसाठी आवश्यक इमारतही उभारली. क्रिकेट स्पर्धेसाठी उत्तम पीच उभारले आहे. पवन तलावाप्रमाणेच गोवळकोट येथेही पालिकेने दर्जेदार क्रीडांगण उभारले आहे.
यापूर्वी स्व. पी. के. सावंत यांनी कोकण आणि चिपळूणच्या विकासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. काही वर्षांपूर्वी पवन तलाव मैदानाला स्व. सावंत यांचे नाव देण्याचे निश्चित झाले होते; मात्र यावर शिक्कामोर्तब झाले नाही. स्व. सावंत यांनी दिलेल्या योगदानाची नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे पवन तलाव मैदानाला स्व. बाळासाहेब सावंत क्रीडांगण असे नाव देण्यात यावे, अशी मागणी काणे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 22/Feb/2025
