वन्यजीव, वनस्पतींचे संरक्षण करणे काळाची गरज : मोहन उपाध्ये

मंडणगड : आज निसर्गातील वन्यजीव व विविध वनस्पतींचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. कारण, अनेक प्रकारचे जीव व वनस्पती आजच्या आधुनिक युगात नष्ट होत चालल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध वन्यजीव संवर्धन मोहिमेमधील यशस्वी झालेली एक मोहीम म्हणजे सागरी कासव संवर्धन मोहीम होय, असे प्रतिपादन वेळास येथील कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी केले.

येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘वेस्टर्न घाट निसर्ग मंडळा’चे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून वेळास येथील कासवमित्र मोहन उपाध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. शैलेश भैसारे, डॉ. विष्णू जायभाये, डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. शैलेश भैसारे यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. संगीता घाडगे यांनी प्रमुख उद्घाटक कासवमित्र मोहन उपाध्ये यांची ओळख करून दिली.

प्राचार्य डॉ. राहुल जाधव म्हणाले की, अशा प्रकारच्या विविध उपक्रमाद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम केले जाते. निसर्गाचे संरक्षण होणे आज आवश्यक बनले असून, जर आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे. या कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शैलेश भैसारे यांनी तर आभार डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 27/Feb/2025