रत्नागिरी : पहिला शिवछत्रपती पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर ३० हून अधिकवेळा सुवर्ण कामगिरी करणारी रत्नागिरीची योगापटू पूर्वा शिवराम किनरे हिला महाराष्ट्र शासनाचा सन २२-२३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाने योगा क्रीडा प्रकाराला यंदापासून शिवछत्रपती पुरस्कार देण्याची घोषणा केल्यानंतर, पहिल्याच पुरस्कारावर रत्नागिरीच्या पूर्वान नाव कोरले आहे.
रत्नागिरी येथे रा. भा. शिर्के हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच योगा या खेळाकडे वळलेला पूर्वा किनरे हिला लहानपणापासून क्रीडा अधिकारी रविभूषण कुमठेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शालेय पातळीवरही तिने जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी केली.
तब्बल ३० राष्ट्रीय योगा स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदके पटकावली. शालेयस्तरावर असताना २०१३मध्ये फ्रान्स पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत तीन रौप्य पदके पटकावली होती. फेडरेशनच्या राष्ट्रीय विविध स्पर्धांमध्येही सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई तिने केली आहे. नुकत्याच २०२३ गोवा येथे झालेल्या शासनाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात योगामध्ये आर्टीस्टीक ग्रुप इव्हेंटमध्ये सुवर्णपदक, आर्टीस्टीक पेअर प्रकारात सुवर्ण तर रिदामिक पेअर प्रकारात रौप्य पदक पटकावले होते. २०२४मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आर्टीस्टीक प्रकारात ब्रॉन्झ पदक पटकावले आहे. आपल्याला लहानपणापासून योगा शिक्षक रविकिरण कुमठेकर यांच्यासह आईवडील, राष्ट्रीय योगा फेडरेशनचे सचिव डॉ. जयदीप आर्य, महाराष्ट्र राज्य योगा असोसिएशनचे डॉ. संजय मालपाणी, सतीश मोहगावकर, राजेश पवार यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे तिने सांगितले. या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोनानंतर योगाचे महत्त्व वाढले
राज्य शासनाने योगा क्रीडा प्रकाराचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारासाठी केल्यानंतर पहिलाच जाहीर झालेला पुरस्कार आपल्याला मिळाला, याचा खूप आनंद झाला आहे. कोरोनानंतर योगाचे महत्त्व वाढले असून, शासन पातळीवरही त्याची मोठी दखल घेतली गेली असल्याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया या पुरस्कारानंतर पूर्वा किनरे हिने व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 04/Oct/2024