रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलेन्स फाऊंडेशनतर्फे गेल्या दोन वर्षांपासून सागर महोत्सवाचे आयोजन केले. संपूर्ण कोकणात जागरूकता आणि सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने आसमंत तरुणांसोबत काम करत आहे.
आसमंतने शुक्रवारी, दि. ४ ऑक्टोबर रोजी येथील ला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रिन्सिपल कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे, अशी माहिती आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.
या परिषदेत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटचे डॉ. गुरुदास नूलकर यांचे मुख्य व्याख्यान होणार आहे. सकाळी १०.३० पासून संध्याकाळी ५ पर्यंत विविध व्याख्याने, कार्यक्रम होतील. पुण्यातील तीन प्रसिद्ध महाविद्यालये, कोकणातील विविध जिल्ह्यांमधील काही महाविद्यालयांचे प्राचार्य सहभागी होणार आहेत.
आसमंत महासागरांवर काम करत आहे. महासागर हे मासे, इतर सागरी प्राणी आणि जलचरांचे घर आहे. आसमंतचा ‘सागर महोत्सव’ दरवर्षी नवी क्षितिजे उघडत आहे. रत्नागिरीचे गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गेल्या दोन वर्षांपासून या महोत्सवात सक्रिय सहभाग घेत आहेत. यानिमित्ताने प्रत्येक महाविद्यालयाने अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून हाती घेऊन सागर महोत्सवाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांत भाग घ्यावा, अशी आसमंतची अपेक्षा आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले.
कार्यक्रमात आसमंतच्या सागर महोत्सवाची माहिती आणि जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील महाविद्यालयांना यामध्ये कसे सहभागी करून घेता येईल, याबाबत विचारविनिमय होणार आहे. जे प्राचार्य सहभागी होतील, त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बारा महिन्यांची निसर्ग/सागर/ पर्यावरण क्षेत्राशी संबंधित कार्ये दिली जाणार आहेत. ही कार्ये जे विद्यार्थी पूर्ण करतील त्यांना आसमंत आणि गोखले इन्स्टिट्यूट (शाश्वत विकास अभ्यास केंद्र) यांच्यामार्फत प्रमाणपत्र आणि जे महाविद्यालय सर्व बारा कार्य उत्तम प्रकारे पूर्ण करेल, त्या महाविद्यालयांना रोख पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. महाविद्यालयांनी केलेल्या कार्याचे मूल्यांकन या क्षेत्रातील तज्ज्ञ करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 04-10-2024
