गोवा कारागृहात न परतलेल्या आरोपीवर रत्नागिरीत गुन्हा

रत्नागिरी : गोवा राज्यातील कोलावले येथील मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल रजेवर रत्नागिरीत आलेला खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी रजा संपूनही कारागृहात न परतल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय ३३, मूळ रा. विजापूर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात गोवा राज्यातील मरगाव शहर पोलिस ठाण्यात २६ सप्टेंबर २०११ रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला अतिरिक्त सत्र न्यायालय मरगा राज्य गोवा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो कोलावले, तालुका बारदेस जि. नॉर्थ गोवा येथील कारागृहात न्यायबंदी होता.

त्याला ११ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ अशी एकूण ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. या पॅरोल कालावधीत न्यायबंदी हा रत्नागिरी येथील मस्तान मोहल्ला मिरकरवाडा येथे राहणाऱ्या सलवा सादिक नावडे यांच्याकडे राहणार होता. ही ३० दिवसांची रजा भोगून ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. आरोपी चन्नापा गंगवार स्वतःहून मध्यवर्ती कारागृह कोलावले येथे हजर होणे आवश्यक होते. परंतु, तो अद्यापपर्यंत हजर झालेला नाही. त्यामुळे कोलावले कारागृहातून पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 04/Oct/2024