पाचल-जावळेथर रस्त्याचे काम येत्या दोन महिन्यांत मार्गी लावणार : आ. किरण सामंत

पाचल : गेले अनेक वर्षे रखडलेला पाचल-जावळेथर रस्ता मूर-सुतारवाडी ते तळवडे ताम्हाणे फाटा या रस्त्याचे काम येत्या दोन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्वासन नवनिर्वाचित आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी दिले आहे. विकासात्मक कामाची चर्चा व कामाचा आढावा घेण्यासाठी तळवडे ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सरपंच सौ. गायत्री साळवी यांनी त्यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले.

यावेळी पत्रकार सुरेश गुडेकर यांनी पाचल-जवळेथर रस्त्याचे मूर सुतारवाडी ते तळवडे ताम्हाणे फाटा या रस्त्याची झालेली दुरवस्था, प्रवाशांचे होणारे हाल, वाहन चालकांना करावी लागणारी कसरत व तीन तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची आग्रही मागणी आ. किरण सामंत यांच्याकडे केली. या मागणीची आमदार किरण सामंत यांनी तत्काळ दखल घेत या रस्त्याचे काम येत्या मे महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचा शब्द परिसरातील सरपंच व पत्रकारांना दिला. त्यामुळे उपस्थित सर्वांनीच त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले.

पाचल-जवळेथर रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आलेली झाडे करपून जात आहेत. ही झाडे लावताना योग्य हंगाम, योग्य वेळ, ती जगण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे शासकीय पैशाची उधळपट्टी होत असल्याचा प्रकार काही ग्रामस्थांनी आमदार सामंत यांच्या निदर्शनास आणून दिला.

आ. सामंत यांनी याबाबत अधिकाऱ्यांना या हंगामात झाडे लावण्याचे काम थांबवण्यात यावे. तसेच येत्या जून महिन्यात लागवड कारावी, अशा सूचना देखील दिल्या आहेत. आमदार किरण सामंत यांनी केलेल्या या सूचनांचे सर्वांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या तळवडे-इंजनवाडी रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, परिसरातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 03/Mar/2025