‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी
राजापूर: मुख्यमंत्री जनआरोग्य शिबीर अर्थात राजापूर तालुक्यातील तारळ येथे ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबीर’ अतिशय उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार, मोफत आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उदात्त उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेतला.
समता फाउंडेशनच्या सहकार्याने विविध चाचण्यांचे आयोजन
या शिबिराचे आयोजन समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. शिबिरादरम्यान प्रामुख्याने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. याशिवाय आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाब (High Blood Pressure) यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे (NCD) स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या रक्त तपासण्या, ईसीजी (ECG) आणि किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन (HB) तपासणी यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि वेळेत उपचार
विविध आजारांचे लवकरात लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावेत, हा या आरोग्य शिबिराचा मुख्य हेतू होता. शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. देसाई यांनी रुग्णांची सखोल डोळ्यांची तपासणी करून आवश्यक असणाऱ्या रुग्णांना पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी योग्य ते मार्गदर्शन केले. त्यांना आरोग्य सहाय्यक नितीश शेटे यांनी मोलाचे सहकार्य केले. तर ईसीजी तपासणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी ईसीजी तंत्रज्ञ शिनगारे यांनी यशस्वीपणे सांभाळली.
स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची उपस्थिती
या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक पोलिस पाटील, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरे, आरोग्य सहाय्यक लांघी, आरोग्य सहायिका मदने आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, प्लेबो, मदतनीस आणि वाहन चालक यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय चमुने आणि ग्रामस्थांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 15-07-2026














