रत्नागिरी : जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असू, पहिल्या टप्प्यात बदली पोर्टलवर नवीन भरती झालेल्या शिक्षकांना माहिती भरून घेतली जात आहे. पुढील टप्प्यात इच्छुक शिक्षकांची माहिती भरून घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांच्या संख्येत पुन्हा घट होणार आहे.
मागील दोन वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीने सुमारे साडेतीनशेहून अधिक शिक्षक परजिल्ह्यात गेले. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दोन हजारावर पोचली. सुदैवाने, गतवर्षी निवडणुकीच्या तोंडावर भरती झाल्यामुळे अकराशे शिक्षक नव्याने मिळाले. तरीही जिल्ह्यातील शिक्षकांची एक हजारावर राहिलेली आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातून सुरू झाली होती.
त्या वेळी राज्यशासनाने नव्याने भरती झालेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेवर अंकुश लावला आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले बहुसंख्य शिक्षक हे परजिल्ह्यातीलब आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्यांचा टक्का अधिक आहे.
मागील दहा वर्षात शिक्षक भरती न झाल्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या अधिक झालेली आहे. मागील वर्षी साडेतिनशे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने रवाना झाले. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यांना पर्याय म्हणून कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. रिक्त पदांची संख्या वाढत असतानाच मार्च महिन्यात नव्याने आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे
पुढील शैक्षणिक वर्षात रिक्त पदांचा टक्का वाढू शकतो.
पहिल्या टप्प्यात बदली पोर्टलवर शिक्षकांची माहिती भरून घेतली जात आहे. पुढील टप्प्यात जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जाऊ इच्छितात त्यांची माहिती भरून घेण्यात येईल. यामध्ये शिक्षकांना ज्या जिल्ह्यात जावयाचे असेल तेथील शाळांची माहिती भरावी लागते. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष एप्रिलअखेरीस पूर्ण होणार आहे. त्यानंतर जून महिन्यात पुढील शैक्षणिक सत्र सुरू होईल. या टप्प्यात आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची वानवा असेल.
रिक्त पदांची संख्या रिक्त पदांची स्थिती पाहता आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना परजिल्ह्यात पाठवू नये. तसे झाले तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. ग्रामीण भागातील शाळांमध्ये गैरसोय होऊ नये, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. संतोष येराडे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 04/Mar/2025














