माखजन : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या आरवली येथील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठेखड्डे पडले असून, त्यात चिखलयुक्त पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही कसरत करावी लागत आहे.
सर्वत्र खडी पसरली आहे. या रस्त्याच्या लगत असलेली साईडपट्टी देखील खचली असून, अपघाताचा धोका वाढला आहे. गणेश उत्सवापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सर्वत्र रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवल्याचा प्रत्यय आरवली येथे येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून तो पूर्ण होईपर्यंत मूळ रस्ता व सर्व्हिस रोड हे चांगले ठेवण्याची जबाबदारी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागवार निश्चित करण्यात आली होती. परंतु या रस्त्यांच्या डागडुजीकडे कुणीही लक्ष न दिल्याने हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे; अन्यथा याठिकाणी रास्ता रोको केला जाईल, असा इशारा कॉंग्रेसचे मंगेश परकर यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 04/Oct/2024