संगमेश्वर : ‘त्या’ पीडित मुलींचा बालकल्याण समितीपुढे जबाब नोंदवणार

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात शाळकरी मुलींशी संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी गैरप्रकार केल्याच्या गुन्ह्याला नवे वळण मिळाले आहे. संस्थेतील कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीशी विसंगत माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे संबंधित पीडित मुलींचा बालकल्याण समितीपुढे जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानुसार गुन्ह्यासंबंधी पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संगमेश्वर येथील शाळेमध्ये मुलींशी मुख्याध्यापक, संस्थाचालक हे गैरप्रकार करत असल्याची तक्रार दाखल केली होती. ही बाब समोर येताच संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नुकतेच संगमेश्वर येथे शिक्षकाकडून मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. संस्थेतील कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार प्रथम रत्नागिरी शहर पोलिसात शून्य नंबरने गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तसेच पुढील तपासासाठी हे प्रकरण संगमेश्वर पोलिसांकडे सोपवण्यात आले होते.

संगमेश्वर तालुक्यामध्ये हे मुलींची शाळा व वसतिगृह सुरू आहे. अनेक ग्रामीण भागातील गरजू गरीब मुलींना वाडी, पाड्यावरून शिक्षणासाठी येथे आणण्यात येते. या मुलींच्या वसतिगृहासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन होत असल्याची ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. लहान मुलींचा प्रश्न असल्याने प्रशासनाकडून तातडीने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. संस्थेतील कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक यांच्यासह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करताना पीडित मुलींचा जबाब नोंदवण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 04-10-2024