रत्नागिरी-पुणे-चिपळूण मार्गावर रातराणी बससेवा सुरू

देवरुख : सतत २५ वर्षे मागणी होत असलेली एस.टी. ची रत्नागिरी-पुणे व्हाया चिपळूण रातराणी, शिवशाही गाडी १ ऑक्टोबरपासून या मार्गावर सुरू करण्यात आल्याबद्दल प्रवासी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण येथील प्रवाशांची सोय होणार आहे.

एसटी. तर्फे सर्व्हे करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील ‘गोल्डन स्ट’ मध्ये समावेश असतानाही व खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असलेल्या या मार्गावर एस.टी. ची गाडी सुरू करण्यात यावी, याची सातत्याने मागणी होऊनही या मार्गावर गाडी सुरू करण्यात येत नव्हती. मात्र, सध्या चालू असलेल्या एस.टी. प्रवासी दिन माध्यमातून देवरुख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केलेल्या आग्रही मागणीला रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नियंत्रक मा. श्री. बोरसे यांच्याकडे केली. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन अतिशय सुंदर ए.सी. शिवशाही गाडी या मार्गावर सुरू केली आहे. रत्नागिरीहून रात्री ८.३० वा., संगमेश्वरहून रात्री ९.४५ वा. व चिपळूणहून रात्री ११ वा. ही गाडी पुण्याला जाणार आहे.

रत्नागिरी-साखरपा-कोल्हापूर- पुणे, रत्नागिरी-साखरपा-मलकापूर- कोकरूड मार्गे पुणे या मार्गावर तीन- तीन गाड्या चालविण्यात येत होत्या. या मार्गापेक्षा प्रवासी भारमान संगमेश्वर-सावर्डे-चिपळूण या मार्गावर असताना गाडी चालू करण्यात येत नव्हती.

अखेर जास्त प्रवासी भारमान असलेल्या रत्नागिरी-चिपळूण-पुणे या मार्गावर रातराणी शिवशाही गाडी सुरू झाल्यामुळे संगमेश्वर, सावर्डे चिपळूण येथील प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 05/Oct/2024