गुहागर : गुहागर आगाराला पंधरा नव्या बसेस मिळणार असून, याबाबतची मंजुरी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी यासाठी प्रयत्न केले होते.
गुहागर आगारात असणाऱ्या बसेस या खूप जुन्या असून, गेली १०-१२ वर्षे या आगारासाठी नवीन बसेस पुरवण्यात आलेल्या नाहीत. आता आगारात असणाऱ्या बसेस या खूप जुन्या झाल्या असून, त्या वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अनेक बसेस गळक्या असून, पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांची गरज भागवली जाते. हे लक्षात घेऊन गुहागर आगाराला १५ नव्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना नेते, मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. या संबंधीचे पत्र आमदार जाधव यांनी देताच मंत्री सरनाईक यांनी ही मागणी मान्य करून तत्काळ संबंधितांना निर्देश दिले.
मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आज आमदार जाधव यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेतली. त्या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या आणि जुन्या झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस बंद करून शिवाई, शिवनेरी यासारख्या नव्या गाड्या द्याव्यात, अशीही मागणी केली आहे. ही मागणीदेखील सरनाईक यांनी मान्य केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 12/Mar/2025














