रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपरिक वादामुळे जिल्ह्यातील केळवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
शिमगोत्सव; केळवडे, नागावेत जमावबंदी; अतिरिक्त बंदोबस्त गावात पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन फिरण्यास बंदी घातली आहे. जिल्ह्यातील १९ गावांमधील वाद सामोपचाराने मिटवण्यात पोलिसांना यश आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. कोकणातील पारंपरिक सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवासाठी कामानिमित्त गावाबाहेर राहणारे चाकरमानी मुंबई. पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रातून जिल्ह्यात दाखल होतात. यावेळी पारंपरिक वाद उफाळून येतात. मानपानावरून होणाऱ्या वादाचे पर्यवसान हाणामारीपर्यंत येऊन पोहोचते. हे टाळण्यासाठी जिल्हा पोलीस दल शिमगोत्सवापूर्वीपासून वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असते.
शिमगोत्सवापूर्वी २१ गावांमध्ये देवस्थान, पालखीवरून वाद होते. केळवडे (राजापूर), नागाचे (अलोरे चिपळूण) येथील पारंपारिक वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी वारंवार गावभेट, बैठका घेतल्या. परंतु दोन्हीही बाजूंकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे कोणताही यशस्वी तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. उर्वरित १९ गावांमध्ये मध्यस्थीने वाद मिटवण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. दोन्ही गटातील ग्रामस्थांनी एकोप्याने सण साजरा करण्याचा शब्द जिल्हा पोलिसांना दिला आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हा पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, एसआरपी बटालियन, होमगार्ड शिमगोत्सवावर लक्ष ठेवणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरासह ग्रामीण भागात गस्त वाढवली आहे.
शिमगोत्सव एकोप्याने साजरा करा
कोकणातील महत्वाचा सण एकोप्याने उत्साहात जल्लोषात साजरा करून वादमुक्त सणाचा आनंद घ्या, असे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील बंधू-भगिनींना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
१९ गावे अशी…
देवरूखमध्ये दख्खन, निवधे, ओझरेखुर्द, निवेखुर्द, सोनारवाडी, साडवली, राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण, पाथडे, लांजा तालुक्यातील हर्दखळे, वाडगाव, पूनस, बोरथडे, नाटे पोलिस स्थानकांतर्गत देवाचे गोठणे, धाऊलवल्ली, खेडमधील चाटव, सावर्डे, मांडकी, जामसूद, गुहागरमधील आबलोली अशा १९ गावांमधील वाद सामोपचाराने सुटले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 13/Mar/2025














